मुंबई : मुंबईतील साकीनामा परिसरात एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना आज मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागली तेव्हा दुकानात एकूण ११ कामगार झोपलेले होते. यातील नऊ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, आज मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास साकीनामा मेट्रो स्थानकाच्या शेजारीच असलेल्या राजश्री इलेक्ट्रिक अँड हार्डवेअर या दुकानाला अचानक आग लागली. दुकानातून आगीचे लोळ उठलेले पाहून स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दुकानात असलेल्या एकूण ११ कामगारांपैकी दोन जण आगीत होरपळल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. राकेश गुप्ता (वय २२) आणि गणेश देवासी (वय २३) अशी मृत कामगारांची नावे आहेत.
दोनदा भडकली आग
आग दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि साधारण साडेतीन वाजताच्या सुमारास आग विझवण्यात यश आलं. मात्र तासाभरानंतर ही आग पुन्हा भडकली. त्यानंतर पुन्हा शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली.
दरम्यान, आग लागलेल्या दुकानात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक साहित्य होतं. आगीत हे साहित्य पूर्णपणे जळून खाक झालं आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नसून पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.