मुंबई: मध्यरात्रीपासून मुंबईत पाऊस कोसळत असल्याने मुंबईच्या महापौर यांनी मुंबईतील विविध भागात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. महापौर पेडणेकर यांनी दादर हिंदमाता येथील गुडघाभर पाण्यात उभं राहून परिस्थितीची पाहणी करत तात्काळ पाण्याचा निचरा करण्याचे आदेश संबंधितांना दिले.

काल रात्रीपासून मुंबईत पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील रस्ते जलमय झाले असून घराघरांमध्ये पाणी साचले आहे. त्याची दखल घेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज सकाळीच अधिकऱ्यांना बोलावून मुंबईतील विविध भागांची पाहणी करून नागरिकांची विचारपूस केली. महापौर किशोरी पेडणेकर यांनी कांदिवलीतील पश्चिम द्रुतगती मार्गावर जाऊन डोंगराचा ढिगारा दूर करण्याच्या कामाची पाहणी पाहणी केली. तसेच दादर हिंदमाता येथे गुडघाभर पाण्यात उभं राहून त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. बीकेसी येथील मिनी पंपिंग स्टेशनलाही किशोरी पेडणेकर यांनी भेट देऊन पाणी उपसा करणाऱ्या पंपाची पाहणी केली. कलानगर तसेच इंदिरानगर या परिसरात भरणाऱ्या पाण्याचा उपसा या पंम्पिंग स्टेशनद्वारे केला जातो. गतवर्षी या परिसरात भरलेल्या पाण्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने या मिनी पंपिंग स्टेशनची उभारणी केली आहे.

तर, मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने पालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी आज मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. आयुक्त चहल यांनी थेट अंधेरीच्या मिलन सबवेवर जाऊन पाहणी केली. तसेच मिलन सबवेच्या ठिकाणी अधिकचे पंप लावून पाणी उपसण्याचे संबंधितांना आदेशही दिले. या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांच्या समवेत अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरसू, महापालिका आयुक्तांचे उपायुक्त चंद्रशेखर चोरे, पायाभूत सुविधा विभागांचे संचालक संजय दराडे यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. आजच्या पाहणी दौऱ्यादरम्यान वांद्रे पूर्व परिसरातील ओएनजीसी पातमुखाजवळील भागाची महापालिका आयुक्तांनी पाहणी केली.

रस्त्यांवरील खड्ड्यांतून मुंबईकरांची सुटका कधी?: भाजप

मुंबईत आज पावसाचा जोर असल्याने भाजपा नेते, आमदार यांनी तातडीने महापालिका मुख्यालयात जाऊन आपत्कालीन कक्षाच्या अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईत आज अनेक भागात पाणी साचले असून दरडही कोसळली आहे. त्यात दुपारी समुद्राला मोठी भरती असल्याने भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शेलार पालिकेत आले होते. करोनामुळे आपत्कालीन कक्षात प्रवेश निषेध करण्यात आला असून आपत्कालीन कक्षाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांची पालिकेतील भाजप कार्यालयात भेट घेऊन शेलार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना रस्त्यावरील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यातून मुंबईकरांची सुटका कधी? असा सवाल त्यांनी पालिका आयुक्त आणि शिवसेनेला केला आहे.

रम्यान, मुंबई आणि शहरामध्ये मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दादर, कुर्ला, सायन, मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अजूनही या भागात पावसाचा जोर कायम असल्याने मुंबईतील सखल भाग पाण्याने भरून गेले आहेत. मुंबईतील दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. हिंदमातामध्ये तर दोन ते तीन फूट पाणी भरल्याने येथील वाहतूक कोंडी झाली आहे. हिंदमाता येते तर वाहनांमध्ये पाणी शिरल्याने वाहने बंद पडली आहेत. हिंदमातामध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पंपाद्वारे पाणी काढण्यास सुरुवात केली आहे. दहिसर येथील दौलत नगर भागातील दहिसर नदीला पूर आला असून नदीने अक्राळविक्राळ रुप धारण केलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here