मुंबई: काँग्रेसचे बडतर्फ खासदार राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांची खिल्ली उडवल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार प्रचंड आक्रमक झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावर टीकेचे आसूड ओढले होते. तसेच काँग्रेससोबत महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेलाही (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुख्यमंत्री शिंदे यांनी जाब विचारला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर ‘आम्ही सावरकर’ असा डीपी लावण्यात आला होता. सावरकरांसाठी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घेतलेल्या आक्रमक भूमिकेची बरीच चर्चाही झाली होती. मात्र, ही पत्रकार परिषद झाल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

हा व्हिडिओ पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वीचा असल्याचे सांगितले जाते. पत्रकार परिषद सुरु होण्याच्या काही क्षण आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकमेकांशी कुजबूज करताना दिसत आहेत. मी वाचू का, असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ नाही वाचायची गरज नाही’. त्यानंतर पुढे देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या कानात काहीतरी सांगायचे होते. मात्र, समोर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असल्याने फडणवीसांनी तो मोह आवरता घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलायला सुरुवात केली. तेव्हादेखील देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर काहीशी बैचेनी दिसत होती. परंतु, एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीची पाच-सहा वाक्ये उच्चारल्यानंतर देवेंद्र फडणवीस काहीसे रिलॅक्स होताना दिसले.

बाबासाहेबांची जयंती दिमाखात झाली पाहिजे, चैत्यभूमीवरील सुविधांमध्ये कमतरता ठेऊ नका, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

कालच्या पत्रकार परिषदेची सुरुवात एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींवर टीका करताना राज्य सरकारची भूमिका सविस्तरपणे मांडली होती. मात्र, हे सर्व बोलताना एकनाथ शिंदे हे अधुनमधून टेबलावर ठेवलेल्या कागदाकडे पाहत होते. त्यामधून काही मुद्दे एकनाथ शिंदे यांनी वाचून दाखवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे स्वत:च्या मनातलं बोलत होते की लिहून आणलेलं स्क्रिप्ट वाचून दाखवत होते, याविषयीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या व्हिडिओमुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे हे भाजपने लिहून दिलेलं स्क्रिप्ट वाचतात, असा आरोप नेहमीच केला जातो. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे बोलत असताना त्यांच्यासमोरील माईक खेचल्याचा व्हिडिओही अशाचप्रकारे व्हायरल झाला होता. आतच्या व्हिडिओत मुख्यमंत्री शिंदे ‘वाचून बोलू का?’, असा प्रश्न फडणवीसांना विचारताना दिसत असल्याने विरोधकांच्या दाव्याला बळ मिळताना दिसत आहे.

बाळासाहेबांचा तो फोटो दाखवत शिंदेंचं उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज; सावरकरांच्या मुद्द्यावरून घेरलं!

एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली होती. ‘उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत सावरकरांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असे सांगितले. पण अपमान सहन करणार नाही, म्हणजे नेमकं काय करणार? उद्धव ठाकरे हे सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांच्या थोबाडीत मारणार आहेत का, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here