मुंबई: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणारे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. २६ मार्च रोजी रोजी छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये आयोजित एका बैठकीमध्ये संजय शिरसाट यांनी श्रीमती सुषमा अंधारे यांच्या बाबतीत अतिशय अर्वाच्य भाषेत आणि खालच्या पातळीवरती जाऊन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केले होते. यासंदर्भात सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे रीतसर तक्रार अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. महिला आयोगाने शिरसाट यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. जोपर्यंत शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका सुषमा अंधारे यांनी घेतली आहे. त्यामुळे आता संजय शिरसाट, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे. यावर आता संजय शिरसाट काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल. तसेच राज्या महिला आयोग संजय शिरसाट यांच्यावर कारवाई करणार का, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संजय शिरसाटांची लेकीबाळींकडे बघण्याची दृष्टी गलिच्छ आणि विकृत; सुषमा अंधारेंचा पलटवार

संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले होते?

संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना मेळाव्यात बोलताना सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र, यावेळी संजय शिरसाट यांची जीभ घसरली होती. त्यांनी म्हटले होते की, ‘ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहीत…’, असे संजय शिरसाट यांनी म्हटले होते.

संजय शिरसाटांना खरंच हार्ट अटॅक आला होता का? मुंबईत ७२ व्या मजल्यावरील फ्लॅट कोणाचा?; रुपाली ठोंबरेंचा सवाल

सुषमा अंधारेंचा पलटवार

संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. संजय शिरसाटांनी माझ्याबद्दल काहीतरी सवंग सुमार शाब्दिक टिप्पणी केल्याचे माध्यमांकडून समजले. इतरांच्या लेकीबाळीकडे, आई किंवा बहिणीच्या नात्याने बघण्यासाठी अंगी शील पारमिता असावी लागते. सत्ता आणि संपत्तीची धुंदी आलेल्या शिरसाट सारख्या लोकांकडे अशी शील पारमिता असण्याची सुतराम शक्यता नाही. उलटपक्षी शिरसाटच्या बोलण्यातून महाराष्ट्रातील लेकिबाळीकडे बघण्याची त्यांची दृष्टी किती गलिच्छ आणि विकृतीने बरबटलेली आहे याचाच त्यांनी पुरावा दिला, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here