आकाश २६ सप्टेंबर २०२२ रोजी बसनं आग्र्याला जात होता. सकाळी ६ वाजता तो आग्र्याच्या आधी येणाऱ्या कुर्रा फाट्यावर लघुशंकेसाठी उतरला. त्यावेळी साध्या वेशात तिथे काही पोलीस कर्मचारी आले आणि त्यांनी आकाशवर गोळ्या झाडल्या, असं आकाशच्या कुटुंबीयांनी सांगितलं. आकाशवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. दोन गोळ्या त्याच्या मांडीवर लागल्या, एक गोळी पोटात लागली. त्यानंतर त्याला लखनऊच्या एका रुग्णालयात नेण्यात आलं. ४८ दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. पण आकाशचा जीव वाचू शकला नाही.
या प्रकरणी आकाशच्या आईनं पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी बोगस चकमकीत आकाशचा जीव घेतल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. न्यायालायनं पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवून तपासाचे आदेश दिले आहेत.
ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आकाश रेती माफियांसाठी ट्रॅक्टर चालवत होता, असा पोलिसांचा दावा आहे. तर आकाशच्या कुटुंबीयांचा दावा वेगळाच दावा आहे. आकाशला ट्रॅक्टरच चालवता येत नाही, असं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. आकाश ज्या बसनं प्रवास करत होता, त्या बस चालकाचा जबाबदेखील नोंदवण्यात आला आहे. आकाश बसनं मुरैयाहून आग्र्याला आला होता, असं चालकानं जबाबात म्हटलं आहे. त्यामुळे पोलिसांवर शंका उपस्थित केली जात आहे.