नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील राहुल गांधी यांच्या टीकेनंतर शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात तणाव निर्माण झाला होता. अगदी काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीवर ठाकरे गटाने बहिष्कार टाकला होता. पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा मध्यस्थाची भूमिका निभावत सावकरांवरील टीका टाळावी, त्यांना माफीवीर संबोधणं योग्य नाही, अशा शब्दात राहुल गांधींना खडसावलं. पवारांच्या म्हणण्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीही सहमती दर्शवली. ज्यानंतर कुणाच्या भावना दुखावत असतील तर मी टीका करणार नाही, अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे.

नवी दिल्लीतील बैठकीत काय झालं?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या निवासस्थानी राजधानी नवी दिल्लीत सोमवारी सायंकाळी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. स्वत: मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी, शरद पवार तसेच विरोधी पक्षाचे इतरही महत्त्वाचे नेते उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटाने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. या बैठकीत भाजपला तोंड देण्यासाठी विरोधी पक्षांनी विशेष रणनीतीवर चर्चा केली. यादरम्यान सावकरांच्या मुद्द्यावरही चर्चा झाली.

यावेळी शरद पवार यांनी राहुल गांधी यांना सावरकरांचं महत्त्व समजावून सांगितलं. सावरकरांचं विविध क्षेत्रांतील योगदान लक्षात घेता त्यांना ‘माफीवीर’ संबोधणं योग्य नसल्याचं म्हणत आपण सावकरकांवरील टीका टाळायला हवी, असं शरद पवार राहुल गांधींना उद्देशून म्हणाले. ज्यावर काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनीही होकारार्थी मान डोलावली.

आक्रस्ताळेपणा अंगलट, गुणरत्न सदावर्तेंना दणका, पुढील २ वर्षे वकिली करता येणार नाही!
शरद पवार यांनी समज दिल्यानंतर राहुल गांधी यांनीही एक पाऊल मागे घेतलं. जर माझ्या टीकेने कुणाच्या भावना दुखावणार असतील तर मी टीका करणार नाही, मी तो वाद टाळण्याचा प्रयत्न करेन, असं राहुल गांधींनी पवारांना आश्वस्त केलं.

पवारांचं एक वाक्य आणि मविआ फुटण्यापासून वाचली

सावरकर यांच्यावरील राहुल गांधी यांच्या टीकेनंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यात तणाव निर्माण झाला होता. दोन्ही बाजूंनी तीव्र प्रतिक्रिया समोर येत होत्या. उद्धव ठाकरे यांनी तर जाहीर सभेत राहुल गांधी यांना खडसावत त्यांच्या टीकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच पुन्हा सावकरांवरील टीका आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही दिला होता. काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील संघर्षामुळे याच मुद्द्यावरुन मविआत फूट पडते की काय? अशी स्थिती होती.

आमदार राहिले बाजूला, बीडकरांचा ‘रुबाब’, धंगेकरांचं डोकं फिरलं, थेट बैठकीबाहेर पडले!
त्याचमुळे पवार यांनी ज्येष्ठत्वाच्या नात्याने एक पाऊल पुढे टाकत मध्यस्थाची भूमिका निभावली. सावकरांवरुन वाद घालण्यापेक्षा काही मुद्दे टाळून भाजपचा विजयी वारु लोकसभेत कसा रोखता येईल, भाजपवर अॅटॅक करण्यासाठी कोणते मुद्दे असावेत, अशी जास्तीत जास्त चर्चा झाली पाहिजे. विरोधी पक्षांनीही त्याच अनुषंगाने टिका टिप्पणी करावी, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here