चेतन, त्याची पत्नी आणि मुलं ग्रँटरोडमधील पार्वती मॅन्शनमध्ये राहायची. वन रुम किचन असल्यानं घरात प्रायव्हसी नव्हती. त्यामुळे चेतन अनेकदा मुलांना बाहेर जाण्यास भाग पाडायचा. त्यासाठी जबरदस्ती करायचा. पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवता यावेत यासाठी त्याचे सतत प्रयत्न सुरू असायचे. पती-पत्नीच्या वादामागे हेच प्रमुख कारण होतं, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
गाला दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. यातील एका मुलीचं लग्न झालं आहे. ग्रँट रोडमध्ये चेतन गाला आणि त्याच्या भावाच्या मालकीचं एक दुकान आहे. ते त्यांनी भाड्यानं दिलं आहे. यातून महिन्याकाठी २० हजार रुपये मिळायचे. दोन भाऊ ते पैसे वाटून घ्यायचे. यातील काही रक्कम गाला स्वखर्चासाठी ठेवायचा. यामुळेही पत्नी आणि मुलांचे चेतनसोबत वाद व्हायचे, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
चेतनसोबतच्या सततच्या वादांना कंटाळून पत्नी आणि मुलांनी शेजारीच असलेल्या पन्नालाल टेरेसमधील फ्लॅटमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हा फ्लॅट गाला यांच्या पालकांचा आहे. पत्नी घर सोडून गेल्यानंतर चेतन यांच्या शारीरिक गरजा पूर्ण होत नव्हत्या. त्यानं पत्नीला अनेकदा घऱी परत बोलावलं. पण तिनं नकार दिला. माझ्यासोबत दिवसातला काही वेळ तरी घालव, अशी विनंती त्यानं करून पाहिली. ही विनंती पत्नीनं धुडकावली. शेजाऱ्यांनी फूस लावल्यामुळेच पत्नी आपल्यासोबत राहत नाही, असा त्याचा ठाम समज होता. शेजाऱ्यांवरचा हाच राग उफाळून आला आणि चाकू हल्ला प्रकरण घडलं.