अचानकपणे मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास राहुल शिंदे यांच्या घरातील फरशी खाली आली. राहुल यांच्या कुटुंबातील एक महिला या खड्ड्यात पडल्यानंतर ती ओरडू लागली. तिच्या ओरडण्याने शेजारील एक महिला काय झालं आहे, हे पाहण्यासाठी आली आणि तिलाही या खड्ड्याचा अंदाज न आल्याने तीदेखील खाली पडली. राहुल शिंदे यांची वृद्ध आई देखील या खड्ड्यात पडली. तीन महिला एकापाठोपाठ खड्ड्यात पडल्याने कोळी गल्लीत एकच गोंधळ उडाला होता.
नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला याबाबत फोनद्वारे कळवूनही अग्निशमन यंत्रणा पोहोचण्यास वेळ लागणार होता. त्यामुळे परिसरातील स्थानिक कोळी समाजाचे कार्यकर्ते या खड्ड्यात उतरले आणि त्यांनी साड्यांच्या गाठी बांधत या महिलांना खड्ड्यातून बाहेर काढले. या खोल खड्ड्यात महिला पडल्या तेथे पाणी होते, वरून दगड-माती पडत असल्याने त्यांना तातडीने वाचवणे गरजेचे होते. अशातच स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत या खोल खड्ड्यात उतरून महिलांना बाहेर काढले. खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर या तिन्ही महिलांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर दाखल केलं आहे.
जखमी कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केला संताप
पंढरपूर स्थानिक प्रशासनाला माहिती देऊनही दिरंगाई झाली. त्यामुळे राहुल शिंदे यांनी संताप व्यक्त केला. स्थानिक नागरिकांची मदत मिळाल्यानेच या तीन महिलांचे प्राण वाचू शकल्याची माहिती माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली. पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने आता हा खड्डा बुजवण्याचे काम सुरू केले असून हा खड्डा आता दगड आणि मुरुमाने भरून घेतला जात आहे .
वारंवार येत असलेल्या पुरामुळे जमीन भुसभुशीत?
पावसाळ्यात पंढरपूर शहरात नदीचे पाणी शिरते. वारंवार येणाऱ्या पुरामुळे या ठिकाणची जमीन गाळाची व भुसभुशीत बनल्याने असे खड्डे पडत असल्याचा अंदाज नागरिक व्यक्त करत होते. सुदैवाने ही घटना मंगळवारी दिवसा घडल्याने त्यांना तात्काळ मदत मिळाली. रात्री झोपेत असताना ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. पंढरपूर शहरातील अशा धोकादायक झालेल्या इमारतींची तपासणी प्रशासनाने हाती घेणे गरजेचे आहे. कारण पंढरपुरातील अशा अनेक घरांमध्ये वारकरी वास्तव्याला उतरतात, त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते.