जेएनयूमध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटले आहेत. विद्यार्थी ठिकठिकाणी जमून या हल्ल्याचा निषेध करत आहेत. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे जमलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनीही हजेरी लावली. शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचंच नाही का?, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
रोहित पवार म्हणाले, ‘जेएनयूमध्ये जी घटना घडली तेव्हा तिथे सर्वसामान्य कुटुंबातील मुलं होती. तिथे जी शुल्कवाढ झाली आहे त्याविरोधात ही मुलं-मुली शांततेत, गांधीजींच्या विचारावर आधारित आंदोलन करत होती. तिथे साबरमती नावाचं होस्टेल आहे, तिथे ही मुलं जमली होती. आंदोलन सुरू असताना तिथे ४० मुलं येतात. कोणत्याही संस्थेत प्रवेश करताना तिथे पास द्यावा लागतो, ओळख सांगावी लागते. असं असताना हे गुंड तिथे आले कसे? दुसरं म्हणजे पोलीस गेटच्या बाहेर तैनात होते. मग आत जेव्हा दोनेक तास हे आंदोलन आणि त्यानंतरचा हाणामारीचा प्रकार सुरू झाला तेव्हा पोलीस कुठे होते? ते आत का गेले नाहीत? तिसरं म्हणजे, विद्यापीठाचे कुलगुरू विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष ठेवून असतात, पण जेएनयूत गेले दीड दोन महिने कुलगुरू दिसत नाहीत. मी माहिती घेतली त्यानुसार, सेमिस्टरचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती, पण ८ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ २ हजार विद्यार्थी परीक्षेचा अर्ज भरू शकले, कारण विद्यापीठातील इंटरनेट सेवा काल बंद होती.’
ते पुढे असंही म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना वाईट पद्धतीने मारलं गेलं. मला असं वाटतं की काही लोकांना शांततेनं केलेलं आंदोलन आवडत नाही का? गांधीजींच्या विचाराने शांततेत आंदोलन करणं चुकीचं आहे का? आम्ही सर्वजण रविवारच्या घटनेचा निषेध करतो.’
दरम्यान, आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही गेट वे ऑफ इंडियातील आंदोलनाला हजेरी लावली. या हल्ल्याविरोधात विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मुंबई, पुण्यासह राज्य आणि देशभरातील विविध शैक्षणिक संस्था तसेच विद्यापीठांमधील विद्यार्थी या आंदोलनाचा निषेध करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times