मुंबई: पुण्याहून नाशिकला जाण्यासाठी बसने पाच ते सहा तास लागतात. आता हे अंतर अवघ्या दोन तासांत कापता येणार आहे. राज्य सरकारने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’ विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाचं संकट असलं तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पूर्ण करू. तसेच हा प्रकल्प पूर्ण करताना चीनची उत्पादने आणि सेवांचा उपयोग केला जाणर नाही, असं उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यास अवघ्या दोन तासांत पुण्याहून नाशिकला जाणं शक्य होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रलायात एक बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट कार्पोरेशन लिमिटेड तथा ‘महारेल’च्यावतीने ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पा’चे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी बोलताना पवार यांनी ही माहिती दिली. कोरोना’चे संकट असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने पुणे – नाशिक हा रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करू असं सांगतानाच या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळेल, असं अजित पवार यांनी सांगितलं.

पुणे आणि नाशिक ही दोन शहरे औद्योगिक, कृषी विकासात अव्वल आहेत. या दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी ‘पुणे-नाशिक सेमी ’ उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील पर्यटन, शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योग क्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार आहे. त्याचबरोबर या रेल्वेमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अत्यंत कमी खर्चात पूर्ण होणारा या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. अवघ्या पाऊणे दोन तासात हे अंतर कापले जाणार आहे. त्याचबरोबर सध्याच्या भूसंपादनाच्या प्रचलित कायद्याप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार आहे. या मार्गावरील रेल्वेस्थानकात बाधित प्रकल्पग्रस्तांसह स्थानिकांना व्यवसायासाठी स्टॉल देताना प्राधान्य दिले जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामातही स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषीमालाच्या वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात येणार असून या प्रकल्पासाठी चिनी उत्पादने किंवा सेवा उपयोगात आणल्या जाणार नाहीत, असंही ते म्हणाले.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार सरोज आहिरे यांनी विविध सूचना मांडल्या.

असा असेल हायस्पीड रेल्वे प्रकल्प!

>> २३५ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग.

>> रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार.

>> रेल्वेचा २०० किलोमीटर प्रति तास वेग, पुढे हा वेग २५० कि.मी. पर्यंत वाढविणार.

>> पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापणार.

>> वेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पुरक प्रकल्प.

>> पुणे-नाशिक दरम्यान २४ स्थानकांची आखणी.

>> १८ बोगदे, ४१ उड्डाण पूल, १२८ भूयारी मार्ग प्रस्तावित.

>> प्रवासी आणि मालवाहतुक चालणार.

>> रेल्वे स्थानकात प्रकल्पबाधितांसह, स्थानिकांना व्यवसायासाठी प्राधान्य.

>> प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार.

>> प्रकल्पाच्या खर्चात ६० टक्के वित्तीय संस्था, २० टक्के राज्य सरकार, २० टक्के रेल्वेचा वाटा.

>> कमी खर्चात प्रकल्प मार्गी लागणार.

>> विद्युतीकरणासह एकाचवेळी दोन्ही रेल्वे लाईनचे बांधकाम होणार.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here