पारनेर तालुक्यातील पळशी या गावामध्ये हे कुटुंब राहते. मोलमजुरी करून त्यांच्या घराचा उदरनिर्वाह चालतो. “जेव्हा काम करेल तेव्हाच घरात चुल पेटेल” अशी परिस्थिती या कुटुंबाची आहे. त्यात वडिलांना दारूचे व्यसन. त्यामुळे मुलांना कुणाचाच आधार नाही. गेल्या सहा महिन्यांपासून हे संपूर्ण कुटुंबासोबत नारायणगाव येथे मोल मजुरीच्या कामाला येत होते.
सोमवारी रात्रीच्या सुमारास ते कुटुंबासह पळशी येथे जाण्यास निघाले. मात्र, रात्रीच्या मिट्ट काळोखात त्यांच्या दुचाकीचा टायर पंक्चर झाला. यात विशेष बाब म्हणजे, ते टायर दोनदा पंक्चर झाला. त्यामुळे ते एका दुचाकीवर पाच जण बसले होते आणि बाकीचे तिघेजण दुसऱ्या दुचाकीवर बसले होते. रात्री साडेअकरा बाराच्या सुमारास समोरून येणारा भरधाव पीकअपनेया पाच जणांना दुचाकीला जोरदार धडक देऊन उडवले आणि दुसऱ्या दुचाकीवरील तिघेजण बाजूला पडले.
नितीन शिवाजी मधे (वय २२), सुंदराबाई रोहित मधे (वय २१), गौरव रोहित मधे (वय ६ वर्ष), आर्यन यमा मधे (वय दीड वर्ष), सुहास यमा मधे (वय २४) यांचा या अपघातात मृत्यू झाला तर अर्चना यमा मधे (वय २२) या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत.
या अपघाताने संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले. स्वतःचे कुटुंब चालवण्यासाठी दुसऱ्या गावात जाऊन उदरनिर्वाह करणारं कुटुंब एका क्षणात उध्वस्त झाल्याने संपूर्ण पारनेर तालुक्यात शोककळा पसरली असून या गावाच्या सरपंचाच्या पुढाकाराने मृतांना मुखाग्नी देता आला.