पुणे:गिरीश बापट यांच्या जाण्याने जनसामान्यांशी नाळ जोडलेला, जमिनीवरच्या परिस्थितीचा जाणीव असणारा आणि अष्टपैलू नेता आपल्यातून निघून गेला आहे. ही भाजप पक्षासाठी आणि समाजासाठी न भरून निघणारी हानी आहे. गिरीशभाऊ गेल्याने आता परिस्थितीला कसं सामोरं जावं, हा प्रश्न आमच्यासमोर आहे. आम्ही गिरीशभाऊंना कधी विसरु शकत नाही. आम्ही त्यांचे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करु, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

गिरीश बापट हे आजारावर मात करतील, असे आम्हाला वाटत होते. पण आता ती आशा संपली आहे. गिरीश बापट यांनी प्रत्येक कामात आपला ठसा उमटवला होता. ते एक हजरजबाबी नेते आणि उत्तम संसटपटू होते. पुण्यातील विकासातील त्यांचं योगदान कोणीच विसरु शकणार नाही. भाजपच्या वाटचालीत त्यांचा फार मोठा वाटा होता. विकास हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Telco कंपनीत कामगार, आणीबाणीत तुरुंगवास, पोटनिवडणुकीत पराभव पण नंतर कायमस्वरुपी ‘किंगमेकर’!

जमिनीशी नाळ असलेले राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपले

आपल्या शोकसंदेशात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर ते खासदार झाले. २०१४ ते २०१९ या सरकारच्या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती. पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या उभारणी करणार्‍या नेत्यांमध्ये ते अग्रणी होते. म्हणूनच जनतेचे त्यांना भरभरुन प्रेम मिळाले.

गिरीश बापटांच्या निधनाने पुण्यातील पोकळी भरुन निघणार नाही, राष्ट्रवादीचा नेता ढसाढसा रडला

राजकारणापलीकडे त्यांची माणुसकी होती; गिरीश बापट यांच्या निधनानं रवींद्र धंगेकरांच्या डोळ्यात पाणी

पुण्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारालाही त्यांनी लढवय्यासारखी झुंज दिली. यातून ते बाहेर येतील, अशी आशा होती. पण, आज ते आपल्याला सोडून गेले. आजारी असताना सुद्धा सातत्याने मतदारसंघावर त्यांचे लक्ष असायचे. त्यांचे निधन ही भारतीय जनता पक्षाची अपरिमित हानी आहे. एक उत्तम संसदपटू, उत्तम वक्ते आपल्यातून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदनेत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here