सध्या तापमानात वाढ होत आहे, मार्च महिन्याचे दिवस असताना कापूस, सोयाबीनला अपेक्षित असा दर मिळालेला नाही. त्यामुळे रब्बीच्या पिकांचं काय होईल ही चिंता शेतकऱ्यांना आहे. ही परिस्थिती असताना काही शेतकरी आपल्या जिद्दीवर शेतात वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करत आहेत. धामणगाव रेल्वे तालुक्यातील गव्हानिपाणी येथील युवा शेतकरी समीर गजानन पाटिल यांनी आपल्या दोन एकर शेतात पहिल्यांदाच प्रायोगिक तत्वावर टरबुज पिकांची लागवड केली आणि समीरचा प्रयोग यशस्वी ठरला.
समीर पाटील यांनी दोन एकर शेतात धनश्री कंपनीच्या सुपर क्वीन वाणाच्या टरबूज पिकाची लागवड केली. कृषी विभागाकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर लागवडीपासून सलग दोन महिन्यापर्यंत समीरने अतिशय कष्टाने टरबूज पिकाचे उत्तम नियोजन केले. अखेर समीरने शेतात केलेल्या कष्टाचं चीज झालं असून शेतात साधारणत: ६ ते ८ किलो वजनाचे टरबूज उत्पादन झाले आहे.उन्हाळा असल्याने रसाळ फळांना असलेली मागणी पाहाता टरबूज पिकाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.त्यामुळे समीर पाटील यांचा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरला आहे.
वाह रे पठ्ठ्या! शेतकऱ्यानं पिकवला थेट काळा गहू; किलोला ७० रुपये भाव,बक्कळ कमाई
समीर पाटील यांना दोन एकर शेतात तब्बल ७० ते ८० टन टरबुजाचे उत्पादन झाले.दोन महिन्यात बाजार भावाप्रमाणे समीरला ५ ते ७ लाखांचे उत्प्नन झाले आहे त्यामुळे समीरने समाधान व्यक्त केले आहे. याबाबत महाराष्ट्र टाइम्स सोबत बोलताना शेतकरी समीर पाटील म्हणाले की केवळ दोन महिन्यात मला टरबूज पिकतून मोठा नफा मिळवता आला.सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर लागवड केली आणि योग्य नियोजन केल्याने मी यशस्वी ठरलो, असं समीर पाटील म्हणाले.