पुणे: तगडा जनसंपर्क, सर्वपक्षीयांशी सलोख्याचे संबंध आणि राजकारणात अभावानेच आढळणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व लाभलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भाजपच्या गोटात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. गिरीश बापट यांच्यावर पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर गिरीश बापट यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शनिवारवाड्यातील त्यांच्या घरी नेण्यात आले. यावेळी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी भाजपच्या नेत्यांची रीघ लागली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील याठिकाणी आले होते. गिरीश बापट यांना शेवटचा निरोप दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना अश्रू अनावर झाले होते. (Pune Loksabha MP Girish Bapat passes away)

Telco कंपनीत कामगार, आणीबाणीत तुरुंगवास, पोटनिवडणुकीत पराभव पण नंतर कायमस्वरुपी ‘किंगमेकर’!

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. गिरीश बापट आणि मी आमदार निवासामध्ये १५ वर्षे एकत्र राहिलो होतो. त्यावेळी गिरीश बापट आमच्यासाठी जेवण बनवायचे. त्यांच्याकडे माणसं जपण्याची कला होती. अगदी साध्या शिपायापासून मंत्र्यांपर्यंत प्रत्येकाशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. गिरीश बापट हे अत्यंत हजरजबाबी होते, समोरच्याला न दुखावता आपला मुद्दा पटवून देण्याचे कसब त्यांच्याकडे असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गिरीश बापट गेल्यानं आता परिस्थितीला कसं सामोरं जावं हे आम्हाला समजत नाहीये: देवेंद्र फडणवीस

बापट दिल्लीला निघाले होते, पण मी महाराष्ट्रात थांबायला सांगितलं: देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांच्या आठवणींना उजाळा देताना २०१४ साली घडलेला एक किस्सा सगळ्यांना सांगितला. गिरीश बापट यांना खासदार होऊन दिल्लीला जाण्याचा प्रचंड इच्छा होती. २०१४ साली ते दिल्लीला जाणारही होते. मात्र, त्यावेळी मीच गिरीश बापट यांना अडवले होते. भाऊ आता राज्यात आपलं सरकार येणार आहे, तुम्ही दिल्लीला कशाला जाता, असे मी त्यांना म्हटले. त्यामुळे गिरीश बापट यांनी लोकसभेची निवडणूक लढवली नाही. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी राज्यात मंत्री म्हणून काम केले. तेव्हा ते म्हणाले की, बरं झालं इथे ही चांगले काम करता येत लोकसभेत गेलो असते तर हा अनुभव मिळालाच नसता. मात्र, २०१९ साली बापटांनी दिल्लीत जाण्याचे मनाशी पक्के केले होते. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ते जिंकून आले, त्यांना दिल्ली मानवली की नाही, यावर मी आता काही बोलू शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here