नवी मुंबई : नेरुळ येथील सेक्टर-६ येथे १५ मार्च रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आलेले बांधकाम व्यावसायिक सावजीभाई मंजेरी यांच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या पाचव्या आरोपीला नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे. रफीक अहमद (४०) असे या पाचव्या आरोपीचे नाव असून तो या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचे आणि त्यानेच सावजीभाई यांच्या हत्येची योजना आखल्याचे तपासात आढळून आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांद्रा येथे वेल्डरचे काम करणाऱ्या आणि खेरवाडी येथे राहणाऱ्या रफिक अहमदला सावजीभाई यांच्या हत्येची २५ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. त्यानंतर रफिक अहमदने गवंडीकाम करणाऱ्या त्याच्या ओळखीतील राहुलला या हत्येची सुपारी दिली. राहुलने त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या बिहारमधील तीन जणांना या हत्येची सुपारी दिली होती. त्यातील एकाने सावजीभाई मंजेरी यांची रेकी केली होती, एक बाईक चालवत होता, तर तिसऱ्याने सावजीभाई यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

ग्राहकांना वीजदरवाढीचा ‘शॉक’ बसणार? १ एप्रिलपासून राज्यात नव्या वीजदराची शक्यता
आरोपी रफिक अहमद याला सोमवारी नेरूळ येथून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. न्यायालयाने त्याला ४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांनी प्रथम मेहेक जयराजभाई नारिया (२८) याला सावजीभाई यांच्या हत्येनंतर १८ मार्चला गुजरातमधून पकडले होते. त्याने मंजेरीच्या हत्येची सुपारी रफिक अहमद याला दिली होती. तर राहुलने कौशल कुमार विजेंद्र यादव (१८), सोनू कुमार विजेंद्र यादव (२३) आणि गौरवकुमार विकास यादव (२४) या तिघांना १० लाखांची सुपारी दिल्याचे तपासात आढळले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत बांधकाम व्यावसायिक सावजीभाई मंजेरी हे नेरुळ सेक्टर-६ मध्ये दररोज मित्राला भेटायला जात होते. सावजीभाईंच्या या दिनक्रमाची माहिती आरोपींना मिळाली होती. नेरुळ सेक्टर-६ मधून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग असल्याने येथून पामबीच मार्गावर तसेच राजीव गांधी उड्डाणपुलावरून थेट सायन-पनवेल मार्गावर जाता येते. हत्येनंतर या मार्गावरुन पळून जाण्यास सुलभ होईल याची कल्पना असल्याने आरोपींनी सावजीभाई यांच्या हत्येसाठी नेरूळ सेक्टर-६ ची निवड केल्याचे तपासात आढळले आहे.

अटक आरोपी तपासात सहकार्य करत नसल्यामुळे रफिक अहमदला प्रत्यक्षात किती पैसे मिळाले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अटक केलेल्या सर्व आरोपींची एकत्रित चौकशी करून संपूर्ण घटनेची पडताळणी केली जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

एसआरएतील घरविक्री आता ७ वर्षांनंतर करता येणं शक्य; मंत्रीमंडळाने दिली मान्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here