छत्रपती राजाराम सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटील गटाचे २९ उमेदवार बाद ठरवण्यात आले. ऊस नियमानुसार घातला नाही म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. यानंतर सभासदांच्या बैठकीत बोलताना आमदार बंटी पाटील यांनी महाडिक यांना आव्हान दिले.
एवढीच जर खुमखुमी होती तर मैदानातून पळ का काढलात?
तुमच्या सत्ताकाळात एवढा जर तुम्ही चांगला कारभार केला होता तर १२ हजार सदस्यांना का घाबरलात? कुस्ती करायची होती मग पळपुटेपणा का करता? जर तुमची एवढीच ताकद होती, एवढीच जर खुमखुमी होती तर मैदानातून पळ का काढलात? उद्याच्या उद्या मैदानात या, आम्ही तुम्हाला लोळविण्यासाठी सज्ज आहोत, अशा शब्दात बंटी पाटलांनी महाडिकांना डिवचलं.
बावड्याचा पाटील मागे हटणार नाही, आता २४ तास राबणार
महाडिक घाबरले म्हणून त्यांनी हा रडीचा डाव खेळला. त्यांनी थेट मैदानात उतरायचे होते. बावड्याचा पाटील कधीही मागे पडणार नाही, असे आव्हान देतानाच लोकांत जाऊन निवडणूक जिंकू शकत नाही हे कळाल्यामुळेच महाडिक यांच्याकडून रडीचा डाव खेळण्यात आला आहे. हिम्मत असेल तर समोरासमोर लढा, सभासदांना निर्णय घेऊ दे, कुस्ती लढायची असेल तर मर्दासारखी लढा. आता तुम्ही रडीचा डाव खेळलाय. मी या कारखान्यासाठी १४ तास लावणार होतो, आता २४ तास राबणार आहे. आता मी झोपणारच नाही. ज्या गावात जाईन, तिथेच वळकट घेऊन जाणार, सकाळी उठून प्रचाराला लागणार, असं सांगत तुम्हाला या लढाईत पाठ टेकायला लावणार, असं आव्हानच बंटी पाटलांनी महाडिक यांना दिलं.
महाडिक अन् पाटील पुन्हा आमने-सामने; सतेज पाटलांचं मिशन राजाराम जोरात, कोल्हापुरातील राजकीय वातावरण पेटलं
निवडणूक निर्णय अधिकार्यावर तुम्ही दबाव टाकला, आम्ही न्यायालयात जाणार
आमदार पाटील म्हणाले, निवडणूक निर्णय अधिकार्यावर दबाव टाकून निर्णय घेतला असला तरी उच्च न्यायालयात आम्ही दावा दाखल करणार आहे. तेथे न्याय आपल्यालाच मिळेल. प्रत्येक गटात आपले उमेदवार आहेत. त्यामुळे ताकतीने ही निवडणूक लढवायची आहे, असे सांगतानाच सहकारातला हा काळा दिवस आहे, अशी संतप्त भावना बंटी पाटलांनी व्यक्त केली.