एमआयएम खासदार इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले?
मी किराडपुऱ्यातील राम मंदिरात उभा आहे. तुम्ही पाहू शकता, इथे काहीही गडबड नाही. बाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे, मात्र मंदिरात मी स्वतः उभा आहे, इथे अनुचित प्रकार घडल्याच्या अफवा पसरवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करा. मी स्वतः जातीने मंदिराच्या आत उभा आहे. बाहेर काही गाड्यांचं नुकसान करण्यात आलं आहे. मात्र मी हात जोडून सर्व लोकांना विनंती करु इच्छितो की कृपा करुन शांतता राखा. राम मंदिरात कुठल्याही प्रकारची चुकीची गोष्ट घडणार नाही, याची काळजी मी स्वतः घेत आहे, असं इम्तियाज जलील म्हणाले.
काय आहे प्रकरण?
दोन गटात झालेल्या किरकोळ वादानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात मोठा राडा झाला होता. समाजकंटकांनी पोलिसांची ८ ते १० वाहने जाळली. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. मात्र पोलिसांनी अधिक कुमक मागवत परिस्थिती नियंत्रणात आणल्यामुळे आता परिसरात पूर्णपणे शांतता आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात तरुणांच्या दोन गटात किरकोळ वाद झाला होता. यानंतर जमावाने दगडफेक करण्यास सुरुवात केली. उपस्थित पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचे वारंवार आवाहन केले तरी जमाव अधिकच हिंसक होत होता. पोलिसांची अधिक कुमक येईपर्यंत जमावाने परिसरात उभ्या असलेल्या वाहनांचीही जाळपोळ सुरु केली होती.
घटनेची माहिती मिळताच मध्यरात्रीच्या सुमारास मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले.