Girish Bapat office: खासदार आणि भाजपचे जेष्ठ नेते गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाले. त्याच्या निधनाच्या २४ तासांच्या आतच त्यांचे शनिवार पेठेतील कार्यलाय नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले.

 

Girish Bapat
पुणे : भाजपचे जेष्ठ नेते गिरीश बापट यांचे काल (बुधवारी) वयाच्या ७२व्या वर्षी निधन झाले. काल रात्री त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यातील एक अजातशत्रू नेता म्हणून गिरीश बापट यांच्याकडे पाहिलं जात होतं. पुण्यातील कोणत्याही नागरिकाला काहीही अडचण असेल तर गिरीश बापट यांचं शनिवार पेठेतील कार्यालय हे ती अडचण सोडवण्याचं हक्काचं ठिकाण होतं. पण आता गिरीश बापट यांच्या निधनानंतर देखील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बापटांच्या निधनाच्या २४ तासांच्या आताच त्यांचं शनिवार पेठेतील कार्यालय नेहमीप्रमाणे सुरु करण्यात आलंय. सकाळी साडेआठ वाजता नेहमीप्रमाणे गिरीश बापट यांचे शनिवार पेठेतील संपर्क कार्यालय कार्यकर्त्यांनी सुरु केले आहे. तर त्यात दैनंदिन कामं देखील सुरु केले आहेत. जिथं दररोज सकाळी गिरीश बापट बसायचे आज त्या ठिकाणी त्यांचा फोटो ठेऊन संपर्क कार्यालयात काम सुरु केले आहे. पुण्यात लोकनेता म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीश बापट हे खऱ्या अर्थाने लोकांचे नेते होते असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. कारण पुण्यातील नागरिकांच्या नेमक्या समस्या हेरून त्याच्यावर लगोलग उपाय शोधण्यात त्यांचा विशेष हातखंडा होता.

गिरीश बापट हे स्वत: कार्यालयात बसून लोकांच्या समस्या जाणून घ्यायचे. त्यांचे प्रश्न जागच्या जागी सोडवायचे. शनिवार पेठेतील कार्यलयात आलेला व्यक्ती हा कधीच रिकाम्या हाताने जात नसे ही बापटांची खासियत होती. इतकंच काय तर खासदार झाल्यापासून गिरीश बापट दिल्लीत असले तरी त्यांचे कार्यालय सुरू असायचे. त्यांच्या ऑफिसातील स्टाफ लोकांची गाऱ्हाणी ऐकून घ्यायचा आणि त्यावर मार्ग काढायचा. मोठ्या समस्या असतील तर बापटांना कळवल्या जायच्या आणि त्या सोडवल्या जायच्या.

गिरीश बापट अनंतात विलीन, पुणे शोकसागरात: ज्येष्ठ नेत्यांच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर

गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट हे आजारी होते. त्यांचं कार्यालयात येणं कमी झालं होतं. पण त्यांचं कार्यालय अविरत सुरु होतं. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या जात होत्या. रुग्णालयातून तर कधी घरातून बापट आवश्यक त्या सूचना द्यायचे. त्यामुळेच काल बापट यांच्या निधनानंतरही त्यांचं कार्यालय सुरू ठेवण्यात आलं. जनसेवा हे बापट यांचं व्रत होतं. तेच सुरू ठेवण्याचं काम गिरीश बापट कुटुंबीयांनी आणि कार्यकर्त्यांनी केलं आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here