शिर्डी : शिर्डीत साईबाबांनी सुरू केलेल्या रामनवमी उत्सवाचे हे ११२ वे वर्ष असून येथील रामनवमी उत्सवाचे एक विशेष वेगळेपण आहे. अनेक दशकांपासून हिंदू आणि मुस्लीम बांधव एकत्र येत हा उत्सव साजरा करतात. शिर्डीत आज मोठा जल्लोष करत देशविदेशातील भाविक दर्शनासाठी दाखल होत आहेत. शिर्डीत रामनवमी उत्सव कसा आणि कधी सुरू झाला? त्यामागची काय कहाणी आहे? हिंदू-मुस्लीम ऐक्य कसं साधलं जातं? याविषयी साईमंदिराचे निवृत्त मुख्य पुजारी बाळकृष्ण जोशी आणि अब्दुल बाबांचे वंशज गनीभाई यांनी माहिती दिली आहे.साईबाबा मंदिराचे माजी मुख्य पुजारी बाळकृष्ण जोशी म्हणाले की, ‘साईबाबांनी स्वतः श्री रामनवमी उत्सव सुरू केला. गोपाळराव गुंड नावाच्या व्यक्तीने साईबाबांना आपण एक उरूस भरावावा अशी संकल्पना मांडली. दोन वर्ष झाल्यानंतर लेखक भीष्म यांच्या असं लक्षात आलं की हा उरूस नेमका श्रीराम जन्मदिनी भरला जातो. त्याला आपण रामजन्मोत्सव का करू नये. त्यामुळे काका महाजनांना त्यांनी सांगितले की आपण बाबांची आज्ञा घेऊया. त्यानंतर ते बाबांकडे गेले आणि त्यांनी आज्ञा देताच बाबांच्या समोर पाळणा बांधून पहिला रामजन्माचा उत्सव साजरा करण्यात आला. राम जन्म उत्सवाचं पहिलं कीर्तन श्री कृष्ण भीष्म यांनी स्वतः केलं. त्यांना हार्मोनियमची साथ स्वतः काका महाजनांनी दिली. बाबांच्या आज्ञेने हा रामनवमी उत्सव सुरू झाला.’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रीय स्मारकाची उभारणी करा, उदयनराजेंची अमित शाहांकडे मागणी, ठिकाण पण सांगितलं

‘रामजन्मोत्सवाच्या दिवशीच संध्याकाळी उरूस भरलेला असतो म्हणून मुस्लीम बांधवही बाबांकडे गेले आणि आपल्याला संदल मिरवणूक करायची आहे, असं सांगितलं. संदल मिरवणुकीसाठीही बाबांनी आज्ञा दिली. तेव्हापासून हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतिक ठरलेला रामनवमी उत्सव उदयास आला. आजही प्रतिकात्मक स्वरूपात श्रीरामनवमी उत्सवात रथयात्रा, किंवा रामजन्मोत्सवात मुस्लीम बांधव हिरिरीने सहभाग घेतात आणि उत्साहाने कार्यक्रम पार पडतो. त्याचप्रमाणे मुस्लिमांच्या संदल मिरवणुकीच्या कार्यक्रमात हिंदू बांधव उपस्थित राहतात. असे एकत्रितरीत्या बाबांच्या समाधीवर चंदनाचे ठसे उमटवली जातात आणि द्वारकामाई मशिदीत संदल मिरवणूक होते,’ अशी माहिती बाळकृष्ण जोशी यांनी दिली

दरम्यान, रामनवमी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने आज राज्यभरातून पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. पुढील तीन दिवस हा उत्सव सुरू राहणार असून पहाटे काकड आरतीपासूनच भाविकांनी साई दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. दिवसभर गर्दी कायम राहणार असल्याने आज रात्रीपर्यंत मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here