कसबा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गणेश भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत राम रक्षा पठण मनसे नेते बाबू वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि आरएसएसचे प्रशांत यादव यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. तर प्रभू श्रीरामांची आरती मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे, बाळा शेडगे आणि गणेश सातपुते यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे.
दुसरीकडे याच कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. मनसेच्या महिला शहराध्यक्ष वनिता वागस्कर, सरचिटणीस किशोर शिंदे, रणजित शिरोळे, प्रवक्ते योगेश खैरे, प्रशांत कनोजिया, आशिष साबळे, अमोल शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार असल्याचं या पत्रिकेत उल्लेख होता. त्यामुळे शहरातील सर्वच बडे पदाधिकारी या कार्यक्रमाला निमंत्रित असताना वसंत मोरे यांचं नाव नसल्याने मोरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’शी बोलताना वसंत मोरे म्हणाले, ‘मला मुद्दाम डावलण्यात येत आहे. शहरातील जवळपास सर्वच सरचिटणीस यांची नावं या पत्रिकेत आहेत. मात्र माझं आणि अनिल शिदोरे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. हे पक्षातील काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत. यासंदर्भातील तक्रार मी आमचे नेते अनिल शिदोरे यांच्याकडे केली आहे. अनेक महिन्यांपासून शहर कार्यकारणी पक्षात मला टार्गेट करत आहे. मात्र आता खूप झालं. मी यासंदर्भात आता थेट राज दरबारी न्याय मागणार आहे. राज साहेब आल्यावर त्यांच्या नजरेसमोर या सर्व गोष्टी ठेवणार आहे,’ असं म्हणत मोरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, ‘माझ्याविरुद्ध पक्षातून षडयंत्र केलं जात आहे. ठरवून पक्षातील काही लोकांकडून मला डावलण्यात येत आहे. शिवतीर्थावर दोन नंबरच्या रांगेत बसणारा मी आहे. परंतु माझं नाव पत्रिकेत वगळलं जात आहे. मला आता ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे. मी लवकरच राज ठाकरे यांच्यांशी बोलणार आहे,’ असं वसंत मोरे म्हणाले.
मनसेला आमचा पाठिंबा; मुस्लीम कार्यकर्त्याकडून राज ठाकरेंच्या फोटोला दुग्धाभिषेक