टाटा मोटर्सने गेल्यावर्षीच्या उलाढालीबाबतची माहिती शेअर बाजाराला दिली असून त्यातून हा आश्चर्यकारक खुलासा झाला आहे. गेल्यावर्षी डिसेंबर २०१९पर्यंत टाटा मोटर्सने नॅनोचं उत्पादन केलं नाही. फेब्रुवारीत केवळ एक नॅनो विकली होती. त्या तुलनेत डिसेंबर २०१८मध्ये ८२ नॅनो कारची निर्मिती केली होती आणि एकूण ८८ नॅनो विकल्या होत्या. नोव्हेंबर २०१९मध्येही टाटा मोटर्सने नॅनोचं उत्पादन केलं नाही. २०१८च्या नोव्हेंबरमध्ये ६६ नॅनोंची निर्मिती केली होती आणि कारखान्यातील एकूण ७७ कार विकल्या होत्या. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्येही एकाही नॅनोची निर्मिती केली नाही. त्या तुलनेत २०१८मध्ये ७१ नॅनोची निर्मिती करण्यात आली आणि ५४ नॅनो विकण्यात आल्या.
दरम्यान, गेल्या वर्षी जरी टाटा मोटर्सने नॅनो कारची निर्मिती केली नसली तरी नॅनोच्या भविष्याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. BS6 उत्सर्जन मानकामुळे कंपनीने कारचं उत्पादन करणं बंद केल्याचं बोललं जात आहे. या कारची किंमत सध्या २.९७ लाख रुपये एवढी आहे. जर नव्या मानकानुसार या कारमध्ये बदल केल्यास या कारची किंमत वाढणार आहे. त्यामुळे भारतातील सर्वात स्वस्त कार म्हणून असलेला या कारचा लौकिक हिरावला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेही या कारचं उत्पादन करण्यात येत नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times