छत्रपती संभाजीनगरः किराडपुरा येथील राम मंदिरात रामनवमी उत्सवाची तयारी सुरू असताना रात्री दोन गटांत वाद झाला. त्यानंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. घोषणाबाजी आणि दगडफेकीमुळं शहरातील तणाव वाढला. दंगलखोरानी पोलिसांच्या गाड्यांना लक्ष्य करुन दगडफेकही केली त्यामुळं शहरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. मात्र पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाने दोन्ही गटातील जमावावर नियंत्रण मिळवले.बुधवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात दोन गटात राडा झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल करण्यात आला. रात्री अकरा वाजेपासून घटनास्थळी गेलेले पोलीस रात्रभर हल्लेखोरांशी खिंड लढवत होते. पोलिसांची संख्या मर्यादित असल्यामुळे जमावाने त्यांना जुमानले नाही. दोन्ही बाजूंनी जमाव जमला आणि मध्यभागी पोलिस अडकले. परिस्थिती हाताभर जात असल्याचे पाहून अधिक कुमकही मागवली.
दरम्यान. सकाळी माध्यमांमध्ये बातम्या सुरु झाल्यावर ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांनी ते दृश्य पाहिले आणि त्यांची चिंता वाढली. याचवेळी घटनास्थळी बंदोबस्तवर असलेले सिटी चौक पोलीस ठाण्याचे कर्मचारी एस.पवार यांच्या पंधरा वर्षाच्या मुलीने बातमी पाहिली. दंगलीचे सुरु असलेले वार्तांकन पाहून तिच्या पायाखालची जमीनच हादरली. आपले वडिल याच ठिकाणी बंदोबस्तासाठी गेल्याचे कळताच ती काळजीत पडली.

मुलीने थेट वडिलांना फोन लावला आणि बाबा सुखरूप असल्याची खात्री केली. दंगलीचे वातावरण शांत झाल्यावर व परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पवार घरी परतले. घरी परतताच त्यांच्या लेकीने धावत जाऊन वडिलांना मिठी मारली आणि इतका वेळ रोखून धरलेल्या अश्रूंना मोकळी वाट करुन दिली अन् एकच हंबरडा फोडला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बाप-लेकीच्या या हळव्या नात्यावर नागरिकांनीही भावूक प्रतिक्रिया दिल्या आहे.
दरम्यान, किराडपुरा येथील रस्त्यावर जमावाकडून पोलिसांवर हल्ले होत असताना, पोलिसांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारात फैज कॉम्प्लेक्समध्ये बंद गेटच्या मागे उभे असलेल्या शेख मुनिरोद्दीन यांना गोळी लागली. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान शेख मुनीरोद्दीन यांचा मृत्यू झाला आहे.