म. टा. प्रतिनिधी, पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांना धमकावून २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. बिडकर यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून अज्ञाताने २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास बदनामी करून राजकीय कारकीर्द संपवण्याची धमकी दिली. याबाबत गणेश बिडकर (वय ५०, रा. सोमवार पेठ) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बिडकर गुरुवारी श्री रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सहभागी झाले होते. त्या वेळी बिडकर यांच्या मोबाइलवर एकाने व्हॉट्सॲप कॉल केला. बिडकर यांना शिवीगाळ करून त्यांच्याकडे २५ लाखांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास बदनामी करून राजकीय कारकीर्द संपविण्याची धमकी दिली. आरोपी हिंदी आणि मराठी भाषेत बोलत होता, असे बिडकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

संयोगिताराजेंना मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास विरोध, आव्हाड संतापले, म्हणाले, सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा!
बिडकर यांना धमकावणाऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावे कोथरूड भागातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मोहोळ यांच्यानंतर बिडकर यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here