अहमदनगर : विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पुन्हा काँग्रेस प्रवेशाचे निमंत्रण देणारे त्यांचे मामा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज नवी भूमिका मांडली आहे. ‘सत्यजित अपक्ष आहेत. अपक्षाला कोणताही पक्ष नसतो. त्यामुळे इतर पक्षांच्या नेत्यांसोबत कुठे भेट देणे अगर इतर निर्णय घेण्याचे त्यांना स्वातंत्र आहे,’ असं थोरात यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. त्यामुळे आमदार तांबे पुन्हा काँग्रेसमध्ये येणार का? त्यांना पक्षात घेतले जाणार का? हे प्रश्न पुन्हा अनुत्तरित राहिले आहेत. तसंच मी यापुढे पक्षविरहित राहणार, या सत्यजीत तांबेंनी घेतलेल्या भूमिकेला थोरात यांनी ग्रीन सिग्नल दिल्याच्याही चर्चांनी जोर धरला आहे.काँग्रेसने पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनासाठी बाळासाहेब थोरात आज नगरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांना आमदार तांबे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तांबे भाजपच्या काही नेत्यांसोबत दिसत असल्याकडे पत्रकारांनी थोरात यांचे लक्ष वेधले. त्याला उत्तर देताना थोरात म्हणाले, ‘सत्यजित अपक्ष आहे. अपक्षाला कोणताही पक्ष नसतो. यासंबंधी पूर्वीच त्याने ट्वीट केले आहे. त्यातून त्याची भूमिका स्पष्ट होते, ती पुन्हा एकदा पाहून घ्या. तो काँग्रेसमध्ये वाढला आहे. काँग्रेसचा विचार त्याच्यात रुजला आहे. पण शेवटी निर्णय त्याचा आहे. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारीच्या मुद्द्यावरून पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्यासंबंधी पक्षाचा निर्णय योग्य वेळी होईल,’ असं थोरात म्हणाले.

Shinde Camp: शिंदे गटातील ४० पैकी २८ आमदार फुटणार? संजय राऊतांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण

‘नगरचे पत्रकार जास्तच चतूर…’

काँग्रेसच्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आलेल्या बाळासाहेब थोरात यांना नगरमध्ये पत्रकारांनी सावरकर, सत्यजित तांबे, जिल्हा बँक यासंबंधीचेच प्रश्न अधिक विचारले. त्यावर थोरात म्हणाले, ‘तुम्ही पत्रकार चतूर असता. त्यातही नगरच पत्रकार जास्तच चतूर आहेत. आता आमच्या काँग्रेसपक्षाच्या आंदोलनासंबंधी बोलू. तुम्ही इतर प्रश्न विचारून त्याच्याच बातम्या करताल आणि आमचे आंदोलन मागे राहील,’ असंही थोरात यांनी म्हटलं. त्यानंतर त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी भाजपचे नेते, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासंबंधीचे प्रश्न विचारण्यात आले. सध्या हे दोन्ही नेते एकमेकांवर मतदारसंघात दहशत पसरवित असल्याचे आरोप करीत आहेत. नेमकी कोणाची दहशत आहे, असे विचारले असता थोरात म्हणाले, हे तुम्हा पत्रकारांना चांगलेच ठावूक आहे. तुम्हीच याचे विश्लेषण करा. वस्तुस्थिती मांडा. माझे चुकत असेल तर माझ्यावर टीका करा, मी ती आनंदाने वाचीन,’ असेही थोरात म्हणाले.

दरम्यान, यावेळी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे उपस्थित होते. यापूर्वी थोरात यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यानंतर काँग्रेसच्या आंदोलनाची पत्रकारांना माहिती दिली.

रोहित पवारांवरचा प्रश्न २ वेळा टाळला, पत्रकाराला झापलं; पण अखेर अजितदादांना आरोपावर उत्तर द्यावंच लागलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here