शिवसेनेचे खासदार यांनी सोमवारी सायंकाळी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री हे अयोध्येत जाणार असल्याचं जाहीर केलं. ते केव्हा अयोध्येत जातील हे दोन दिवसांमध्ये जाहीर करू असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
पत्रकार दिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात राऊत बोलत होते. राऊत म्हणाले, ‘आमची अयोध्येत जाण्याची इच्छा आहे. लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या खासदारांना घेऊन अयोध्येत गेले होते. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांना घेऊन आम्ही अयोध्येत जाऊ. दोन दिवसात तुम्हाला तारीख कळेल.’
राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं, तेव्हा राम मंदिर प्रश्नावर भारतीय जनता पक्षाला आव्हान म्हणून उद्धव ठाकरे अयोध्येत गेले होते. वादग्रस्त राम जन्मभूमी प्रश्नाचा अंतिम निकाल लागला त्या दिवशी ठाकरे यांनी अयोध्येत जाण्याचा पुनरुच्चार केला होता. मात्र राज्यातल्या विधानसभा निकालानंतर राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलली. शिवसेनेने भाजपची साथ सोडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी केली. धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत सत्ता चालवताना शिवसेनेने अनेक मुद्दे बाजुला ठेवले. उद्धव यांनी त्याबाबत जाहीरपणे सांगितलं. त्यामुळे ते पुन्हा अयोध्येची वाट धरणार नाहीत अशी परिस्थिती होती. मात्र संजय राऊत यांनी आज हे स्पष्ट केले की उद्धव ठाकरे लवकरच अयोध्येला भेट देणार आहेत.
२६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याची आठवण: मुख्यमंत्री
दरम्यान, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हल्ल्यानंतर २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली असल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जेएनयूतील हल्ला प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्यातील विद्यार्थी सुरक्षित असून त्यांनी काळजी करू नये असेही उद्धव यांनी म्हटले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times