मुंबईः अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अयोध्येत भूमीपूजन सोहळ्याची जय्यत तयारी असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनीही राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त स्वप्नासाठी होता, त्या स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राम मंदिरा व बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आज या मंगलप्रसंगी बाळासाहेब असते तर त्यांना मनापासून आनंद झाला असता, असं म्हणत त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

वाचाः

जवळपास ३ दशकांचा संघर्ष, शेकडो कारसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त स्वप्नासाठी होता, त्या स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आपल्या रामाचा वनवास संपला. उद्या राममंदिराचं अयोध्येत भूमिपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे. असं राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक करसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला, आज त्या करसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल. ह्यासाठी नेटाने न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. अर्थातच या क्षणी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, आज ह्या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते, त्यांना मनापासून आनंद झाला असता, असंही ते म्हणाले आहे.

वाचाः

अयोध्येत उभं राहणारं राममंदिर हे नेहमीचं मंदिर नाही, ते प्रतीक आहे शतकानुशतकं हिंदू बांधवांच्या मनात सुरु असलेल्या त्राग्याचं, अगतिकतेचं, ते प्रतीक आहे कोट्यावधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचं, सहनशीलतेचं आणि म्हणूनच ह्या क्षणाचं महत्व वेगळं आहे.

हिंदू बांधवांच अभिनंदन

सध्या कोरोनाचं संकट आहे पण ज्या इच्छाशक्तीने कोट्यवधी भारतीयांनी राममंदिराचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाच्या संकटावर मात करून भारत बलशाली होईल ह्याची मला खात्री आहे. असं म्हणत त्यांनी सर्व हिंदू बांधवांचं अभिनंदन केलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here