कापूस बियाणांच्या दरात यावर्षी वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी ४७५ ग्रॅमच्या पॅकेटसाठी ८१० रुपये द्यावे लागत होते. मात्र यावेळी दरवाढ केल्याने आता एका पॅकेटसाठी ८५३ रुपये मोजावे लागत आहेत. केंद्र सरकारने केलेली ही दरवाढ छोटी दिसत असली तरी देखील शेतकऱ्यांना कापसाच्या बियाणांवर मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांचं संकट वाढवणारी ठरणार आहे. मागील वर्षी कापसाचे दर प्रति क्विंटल दहा हजारांच्या वर पोहोचले होते. यावर्षी काही दिवस कापूस दहा हजारांपर्यंत पोहोचलेला नाही. कापसाला आठ ते साडे आठ हजार रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळाला आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा चांगला दर नसल्यानं शेतकरी निराश झाला असून पांढऱ्या सोन्यावरील त्याचा विश्वास उडू लागला आहे. एकीकडे कापसाचे दर कमी होत चालले असतानाही शासन मात्र बियाणांची दरवाढ करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस उत्पादन खर्चात आणखी वाढ सहन करावी लागणार आहे. कापसाचे दर वाढत नसताना उत्पादन खर्च मात्र सातत्याने वाढत आहे. ही बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने आर्थिक अडचणीत भर टाकणारी ठरत आहे. सततचा वाढणारा उत्पादन खर्चामुळे शेतकरी नेहमी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे, असं परभणी धर्मपुरीमधील शेतकरी श्रीकांत देशमुख यांनी सांगितलं.
थायलंडहून आणलेल्या फुलांची विदर्भात शेती; मातीविनाचं रोपांची लागवड, अन् पहिल्याच वर्षी नऊ लाखांचं उत्पन्न
४७५ ग्रॅमच्या प्रति पॅकेटमागे ४३ रुपयांची वाढ
कापसाच्या बियाणांच्या दरवाढीचा शेतकऱ्यांकडून निषेध करण्यात येत आहे. यावर शेतकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. आधीच आर्थिक अडचणी आहेत आणि सातत्याने उत्पादन खर्च वाढत आहे. बियाण्यांची दरवाढ करून जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. सरकारने कपाशीच्या बियाणांच्या दरात वाढ करण्यापेक्षा संशोधनावर लक्ष देत सरळ वाण उपलब्ध करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
असे राहणार दर
कापूस बियाणांचे अधिचे दर १८०० रुपये प्रति किलो होते तर आताच्या दरवाढीनुसार १८९५.९५ रुपये प्रति किलो दर असणार आहेत.