: ६३व्या कुस्ती स्पर्धेत गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी विजेता बाला रफिक शेख आणि उप महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. उद्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर आणि लातूरच्या शैलेश शेळकेमध्ये लढत होणार असल्याने यंदा महाराष्ट्राला नवा महाराष्ट्र केसरी मिळणार आहे. उद्याच्या लढतीत सदगीर जिंकतात की शेळके याकडे महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींचं लक्ष वेधलं गेलं आहे.

बालेवाडी येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे थरारक सामने सुरू आहेत. या स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल लागल्याने स्पर्धेची रंगत अधिकच वाढली आहे. आज माती विभागात गतविजेता बाला रफिक शेख विरुद्ध सोलापूरचा ज्ञानेश्वर उर्फ माऊल जमदाडे यांच्यात लढत झाली. माऊली जमदाडेने चपळाईने डाव टाकत, बाला रफिक शेखला चितपट केलं. पण जमदाडेलाही हा विजय फार काळ टिकवता आला नाही. पुढच्याच फेरीत त्याला लातूरच्या शैलेश शेळकेने धूर चारत कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक दिली.

गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी शेख पराभूत झाल्याची चुटपूट कुस्तीप्रेमींना लागलेली असतानाच गतवर्षीचा उपविजेता अभिजीत कटकेचा मॅट विभागात पराभव झाला. नाशिकच्या हर्षल सदगीरने अभिजीतचा ५-२ असा पराभव करून, थेट फायनलमध्ये धडक दिली आहे. त्यामुळे उद्या नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि लातूरच्या शैलेश शेळके यांच्यात महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदासाठी अंतिम लढत होणार आहे. त्यामुळे उद्याच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here