गेल्या वर्षात कापसाला विक्रमी भाव म्हणजेच १३ ते १४ हजार रूपये मिळाला. म्हणून यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पांढऱ्या सोन्याला पसंती दिली. मात्र सुरुवातीपासूनच कापसाचा बाजार अस्थिर असून शेतकरी संभ्रमात आहे. गेल्या काही दिवसात कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवणं पसंत केलं. मात्र, शेतकऱ्यांना तुरीकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या नक्कीच फलदायी ठरत असल्याचे चित्र आहे. कारण सद्यस्थितीत देशभरात तुरीचे उत्पादन घटले आहे.
मार्च २०२३ मध्ये तुरीला सरासरी भाव हा ८ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. मार्च महिन्यात तुरीला ८ हजार ९६५ रुपये इतका भाव देखील मिळाला होता. मागील महिन्याभरापूर्वी ७ हजार ४०० रुपये प्रतिक्विटल दर होता. शासनाने तूर खरेदीसाठी हमीभाव केंद्रात नोंदणी सुरू केली, मात्र शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली. आगामी काही दिवसांतही तुरीला जास्त भाव मिळण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे.
या पाच महिन्यांत भावात असा झाला चढ-उतार
महिना – तुरीला मिळालेला दर (सरासरी)
नोव्हेंबर – ७ हजार २०० रूपये.
डिसेंबर – ६ हजार ९५० रूपये.
जानेवारी – ६ हजार ८०० रूपये.
फेब्रुवारी – ७ हजार ४०० रूपये.
मार्च – ८ हजार ४०० रूपये. (जास्तीत जास्त भाव ८ हजार ७९५)
अकोल्याच्या बाजारात मागील काही दिवसात मिळालेला तुरीला असा आहे भाव-
तारीख – कमीत कमी – जास्तीत जास्त –
१५ मार्च – ६ हजार – ८,२८० रूपये.
१६ मार्च – ६,८०० – ८,२०५ रूपये.
१७ मार्च – ६ हजार – ८,२९५ रूपये.
१५ मार्च – ६,५०० – ८,४०० रूपये.
२० मार्च – ५,५०० – ८,७०० रूपये.
२१ मार्च – ५,५०० – ८,५०५ रूपये.
२३ मार्च – ६ हजार – ८,४५० रूपये.
२४ मार्च – ६,९२० – ८,६३० रूपये.
२५ मार्च – ५,५०० – ८,७०० रूपये.
२७ मार्च – ५,५०० – ८,८०० रूपये.
२८ मार्च – ७ हजार – ८,९६५ रूपये.
२९ मार्च – ७ हजार – ८,७९५ रूपये.
दरम्यान अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २७ मार्च म्हणजेच सोमवारी तुरीला ५ हजार ५०० पासून ८ हजार ८०० रूपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला होता. तर सरासरी भाव ७ हजार ९०० रूपये इतका होता. दरम्यान गेल्या काही दिवसात तुरीची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने २८ मार्च रोजी तुरीच्या दरात १६५ रूपयांनी वाढ झाली. त्यामुळे तुरीचा भाव ७ हजार ७०० पासून ते ८ हजार ९६५ रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे गेला होते.. परंतु २९ मार्च रोजी म्हणजेच बुधावरी तुरीच्या दरात १७० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळ तुरीचा भाव प्रतिक्विंटल मागे ७ हजार पासून ८ हजार ८ हजार ७९५ रूपयांपर्यत आला.
दुसरीकडे विदर्भातील कापसाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अकोटच्या कृषी बाजारात २८ मार्च रोजी तुरीला ७ हजार ८०० ते ८ हजार ७३० प्रतिक्विंटप्रमाणे भाव मिळाला होता. परंतु, या तुलनेत दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ मार्च रोजी तुरीच्या दरात १३५ रुपयांनी वाढ झाल्याने तुरीला ८ हजार ११० पासून ८ हजार ८६५ रूपयांपर्यत भाव मिळाला. या दिवशी अकोल्याच्या बाजारात असलेल्या तुरीच्या दराच्या तुलनेत अकोटच्या बाजारात तुरीला ७० रुपयांनी तर कापसाच्या दराच्या तुलनेत ४४० रुपयांनी अधिक भाव होता.