राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची स्थापना केली तेव्हापासून डॉ. संजय रोडगे हे शरद पवार यांच्यासोबत होते. रोडगे यांच्या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माजी आमदार विजय भांबळे यांनी विचारात न घेता राष्ट्रवादीचं पॅनल उभं केलं होतं. त्यामुळे रोडगे यांनी स्वतःचं पॅनल उभं केलं आणि सरपंच निवडून आणला. या प्रकारानंतर माजी आमदार विजय भांबळे आणि डॉ. संजय रोडगे यांच्यामध्ये नेहमीच खटके उडू लागले होते. त्यामुळे भांबळे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या काही दिवसातच सेलू येथे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या प्रवेशामुळे जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे राजकारण बदलणार आहे.फडणवीस यांच्या भेटीवेळी मुंबईत डॉ.संजय रोडगे यांच्या सोबत माजी सभापती रविद्रं डासाळकर, दिनकरराव वाघ, सुंदरराव गाडेकर, ॲड.दत्तराव कदम,बाळासाहेब लिपणे, प्रकाशराव गजमल, संजय गटकळ, सोळंके दाजी, दत्तराव लाटे, चव्हाण कैलासराव रोडगे व डॉ.संजयदादा रोडगे मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
वारंवार पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना सांगूनही यात बदल होत नाही. माझी विनाकारण पक्षात घुसमट करण्यात येत आहे. त्यामुळे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या सोबत राहून काम करणार आहे. सेलू येथील कार्यक्रमात लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे, असं डॉ.संजय रोडगे म्हणाले.
ही होती जबाबदारी
पक्ष स्थापनेपासून डॉ.संजय रोडगे हे शरद पवारांसोबत असल्यामुळे त्यांच्या खांद्यावर राष्ट्रवादी सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यासोबतच वाशिम जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून ते काम पाहत होते. मात्र, आता माजी आमदारासोबत पक्षांतर्गत होत असलेल्या वादामुळे त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याने हा राष्ट्रवादी काँग्रेसला परभणी मध्ये मोठा धक्का मानला जात आहे.