ajit pawar, अजून बापटांच्या अस्थीचं विसर्जन नाही, अन् भावी खासदार म्हणून बॅनर लागले, जरा माणुसकी ठेवा, अजितदादांनी खडसावलं – ajit pawar slam jagdish mulik future mp banner in pune after girish bapat death
बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याचे भावी खासदार अशा आशयाची पोस्टरबाजी करणाऱ्यांना चांगलेच सुनावले. आपल्यात जरा माणुसकी राहू द्या, एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचे काही कारण नाही. आपण १३ ते १४ दिवसांचा दुखवटा पाळतो. याचं तारतम्य सगळ्यांनी ठेवावं, अशा शब्दात अजित पवार यांनी बॅनरबाजी करणाऱ्यांना खडसावलं.बारामती येथे बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांना आलेल्या धमकीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. खासदार संजय राऊत यांना जर त्यांना धमकी आली असेल तर त्यांनी रीतसर तक्रार करावी, पोलिसांनी यात लवकर तपास करावा, असं आवाहन करतानाच जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांना अशा प्रकारे धमकी आल्या तर लोकसभा आणि राज्यसभा याची नोंद घेत असते, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नमूद केलं. त्यांच्या धमकीबाबतीत नक्की तपास होईल, यापूर्वी मी सभागृहात बोललो होतो की या आदी देखील नितीन गडकरींना धमकी आली होती, पवार साहेबांना धमकी आली होती, कधी कधी अशा धमक्यांमध्ये तथ्य असतं तर कधी कधी माथेफिरू लोक अशा धमक्या देतात त्यामुळे तपास यंत्रणा तपास करतील आणि कारवाई नक्की होईल, असं अजित पवार म्हणाले. अजून अस्थीचं विसर्जन झालं नाही
दिवंगत खासदार गिरीष बापट यांच्या निधनानंतर पुण्यात लागलीच काहींनी भावी खासदाराचे फलक झळकवल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, मी काल बापट कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. आपल्यात १३-१४ दिवस दुखवटा पाळला जातो. अजून त्यांच्या अस्थीचे विसर्जन झाले नाही. आपल्यामध्ये जरा माणूसकी राहू द्या, एवढे गुडघ्याला बाशिंग बांधायचे काही कारण नाही. सत्ताधारी व विरोधकांनीही यात तारतम्य बाळगले पाहिजे.
संभाजीनगरला झालेला प्रकार हा एका समाजातील अंतर्गत प्रश्न आहे. दोन वेगवेगळ्या समाजात तेथे दंगल झालेली नाही. परिस्थिती आटोक्यात आणण्याचे काम पोलिस यंत्रणेने केले आहे. आम्ही पण ते करत आहोत. या विषयाला कारण नसताना मीडियाने वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करू नये. ते आपापसातले भांडण होते. परंतु छत्रपती संभाजीनगरमुळे त्याला वेगळी प्रसिद्धी मिळाली. तेथे रविवारी आयोजित महाविकास आघाडीच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली असून सभा व्यवस्थित पार पडेल, असे अजित पवार म्हणाले.