मुंबई: गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी आता महाराष्ट्रासह देशभरातील अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त टिप्पणी केली आहे. बागेश्वर धामच्या दरबारात साईबाबांची पूजा वैदिक पद्धतीने का होते, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उत्तर देताना म्हटले की, ‘गिधड की खाल पहनकर कोई शेर नही हो सकता. आपल्या शंकराचार्यांनी साईबाबांना देवाचं स्थान दिलेले नाही. शंकराचार्य हे हिंदू धर्माचे पंतप्रधान आहेत, त्यांच्या आदेशाचं पालन करणे हे प्रत्येक सनातनी हिंदूचे कर्तव्य आहे. काही लोकांची साईबाबांवर श्रद्धा असेल. मला त्यांच्या भावना दुखवायच्या नाहीत. पण साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात पण देव नाही’, असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटले. बागेश्वर बाबांच्या या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच मीरारोड परिसरात त्यांचा दरबार भरला होता. या दरबारासाठी देशभरातील भाविकांनी गर्दी केली होती.

यापूर्वीही बागेश्वर बाबा यांनी वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्यं केल्याचे प्रकार घडले आहेत. राजस्थानच्या गांधी मैदानावर झालेल्या धर्मसभेत त्यांनी एक चिथावणीखोर वक्तव्य केले होते. ‘कुंभलगडमध्ये १०० हिरवे झेंडे आहेत, ते भगव्याने बदलले पाहिजेत. हा भगव्याचा देश आहे, ‘हिरव्या’चा नाही’, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर आता बागेश्वर बाबांनी साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. महाराष्ट्रात साईबाबांच्या भक्तांची संख्या मोठी आहे. परिणामी बागेश्वर बाबांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटू शकतात. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जाणार का, हे पाहावे लागेल.

बागेश्वर बाबा वठणीवर, संत तुकाराम महाराजांबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य घेतलं मागे

नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर बाबा यांनी यापूर्वी नागपूर येथील कार्यक्रमात महाराष्ट्रातील संत तुकाराम यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. त्यावरुनही बराच गदारोळ निर्माण झाला होता. तेव्हा बागेश्वर बाबांनी घूमजाव करत तुकाराम हे महान संत असल्याचे म्हटले होते. आपल्या वक्तव्याविषयी दिलगिरी व्यक्त करत बागेश्वर बाबा यांनी आपले शब्द मागे घेतले होते.

बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाई करा; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश, जनहित याचिका फेटाळली

अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून बागेश्वर बाबांना आव्हान

बागेश्वर बाबा यांच्याकडून दिव्य चमत्काराचा दावा केला जातो. समोरच्या व्यक्तीच्या मनातील गोष्टी आपल्याला न सांगता ओळखता येतात, असा दावा त्यांच्याकडून केला जातो. या दाव्याला अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या श्याम मानव यांनी आव्हान दिले होते. बागेश्वर बाबा स्वत: डॉक्टर नसूनही उपचार सांगतात. त्याचबरोबर अंधश्रद्धा पसरवतात. त्यांनी आमच्यासमोर चमत्कार करुन दाखवावा, आम्ही त्यांना ३० लाख रुपयांचं बक्षीस देऊ, असे श्याम मानव यांनी म्हटले होते. त्यांच्या या आव्हानानंतर बागेश्वर बाबांनी महाराष्ट्रातून काढता पाय घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here