मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात बिघडलेल्या ऋतुचक्रामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसताना दिसत आहे. नेहमीपेक्षा यंदा उष्णतेच्या झळा लवकरच जाणवायला सुरुवात झाली आहे. मात्र, मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या परिसरात एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांमध्येच मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागात उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. हवामान खात्याकडून शनिवारी एप्रिल महिन्यातील हवामानाचे अंदाज जाहीर करण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, दिल्लीसह आग्नेय भारतामध्ये एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत उष्णतेचे प्रमाण सामान्य राहील. मात्र, पूर्वेकडचा भाग, मध्य भारत आणि महाराष्ट्र व गुजरातच्या पश्चिमेकडील किनारपट्टीच्या भागात एप्रिल महिन्यात तापमान हे सामान्य पातळीपेक्षा अधिक राहील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

याशिवाय, सर्वसाधारपणे एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या काळात देशातील जवळपास सर्व भागांमध्ये तापमानाचा पारा नेहमीपेक्षा जास्त राहील. एप्रिलच्या मध्यापासून सर्व राज्यांमधील तापमान वाढण्यासा सुरुवात होईल. हाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, गुजरात आणि हरयाणाच्या काही भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. केवळ दक्षिणेकडील किनारपट्टीचा काही भाग आणि ईशान्य भारतातील काही भाग याला अपवाद असतील. या भागांमध्ये तापमान सर्वसाधारण पातळीपेक्षा कमी राहील, असे भाकीत हवामान खात्याकडून वर्तविण्यात आले आहे.

Maharashtra Rain: हवामान खात्याचा अलर्ट खरा ठरला; मुंबई उपनगर, ठाणे, बदलापूर परिसरात पावसाला सुरुवात

मार्च महिन्यात गेल्या तीन वर्षांमधील सर्वाधिक पाऊस

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशभरात अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यंदाच्या मार्च महिन्यात देशभरात ३७.६ मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या तीन वर्षांमध्ये मार्च महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. यापूर्वी २०२० च्या मार्च महिन्यात ४४.७ मिमी इतका पाऊस झाला होता. मार्च महिन्यात देशात १०० वेळा जोरदार पाऊस झाला.

यंदाचा मान्सून लांबणार?

जागतिक तापमानावर परिणाम करणारा ‘एल निनो’ तीन वर्षांनंतर यंदा पुन्हा प्रभावी होण्याची शक्यता आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळेही २०२३मध्ये तापमानात अचानक प्रचंड वाढ होण्याचा अंदाज आहे. एल निनोचा परिणाम मान्सूनच्या वाटचालीवर होतो. एल निनोचा प्रतिकूल परिणाम झाल्यास मान्सून लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here