पुणे : शहराचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याच्या राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची चर्चा होऊ लागली आहे. महाविकास आघाडीत कोणता पक्ष ही जागा लढवणार, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहे. त्यातच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पोटनिवडणूक काँग्रेसच लढवणार असल्याचं ठामपणे सांगितलं. बापट यांच्या निधनानंतर लगेच पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत अप्रत्यक्षपणे वडेट्टीवार यांना फटकारलं.महाविकास आघाडीत पुण्याच्या जागेवरून रस्सीखेचाचं चित्र निर्माण झाल्यानंतर भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार म्हणून पुण्यात बॅनर लागल्याने वातावरण आणखीनच ढवळून निघालं. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीच्या गोटात अद्याप अजून कोणतीही चर्चा नाही, असं स्पष्ट मत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. जयंत पाटील हे आज गिरीश बापट यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘बापट साहेबांचं नुकतंच निधन झालं आहे. आम्ही कोणीही अजून पोटनिवडणुकीवर काही विचार केला नाही. बापटसाहेबांबद्दल आम्हाला खूप आपुलकी होती. स्वत: पवारसाहेब सगळे कार्यक्रम रद्द करून पुण्याला आले होते,’ असं ते म्हणाले.

शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य, विखे-पाटलांकडून बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

दरम्यान, यावेळी जयंत पाटील यांनी गिरीश बापट यांच्या आठवणींना उजाळा दिला. पाटील म्हणाले, ‘मी अर्थमंत्री असताना अगदी हक्काने येऊन, प्रभागातले प्रश्न आणि समस्या ते माझ्याकडे घेऊन यायचे आणि मला त्यांच्यावर एवढा विश्वस होता की ते योग्यच मुद्दे मांडायचे म्हणून आम्हीही ते प्रश्न सोडवायचो. विधानसभेच्या सदस्यांनी कसे वागावं, काय मर्यादा पाळाव्या आणि कशा पद्धतीने जनतेची सेवा करावी, यांचा आदर्श बापटसाहेबांनी घालून दिला होता. आज ते गेल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली,’ अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here