मुंबई: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कॅम्पसमध्ये काल, रविवारी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचे पडसाद मुंबईसह देशभरात उमटले आहेत. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात विद्यार्थी संघटनांनी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन केलं. या आंदोलनात काही जणांनी ‘फ्री काश्मीर’ असं लिहिलेले फलक हाती घेतले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

दिल्लीतील जेएनयू कॅम्पसमध्ये काल रविवारी संध्याकाळी विद्यार्थ्यांवर चेहरे झाकलेल्या काही व्यक्तींनी हल्ला केला. यात अनेक विद्यार्थी आणि शिक्षकही जखमी झाले होते. या घटनेचे पडसाद आज देशभरात उमटले. मुंबईसह महाराष्ट्रात काही ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनं करण्यात आली. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथेही आज विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलं. मात्र, या आंदोलनात काही जणांच्या हातात स्वतंत्र काश्मीरची मागणी करणारे फलक होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एका तरुणीच्या हाती ‘फ्री काश्मीर’ असा उल्लेख असलेला फलक होता. यावरून आता भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. हा व्हिडिओ रिट्विट करून त्यांनी ठाकरे यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. ‘आंदोलन नेमके कशासाठी आहे? या आंदोलनात ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा का? मुंबईत या अशा फुटीरतावाद्यांना कशासाठी सहन केलं जात आहे? मुख्यमंत्री कार्यालयापासून जेमतेम दोन किलोमीटरवर ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा दिल्या जातात. उद्धव ठाकरे, तुमच्या नाकाखाली ‘फ्री काश्मीर’सारखी देशविरोधी मोहीम खपवून घेणार आहात का?,’ असे अनेक सवाल फडणवीसांनी केले आहेत.

बॉलिवूड रस्त्यावर

जेएनयूत रविवारी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी सोमवारी सायंकाळी रस्त्यावर उतरले. वांद्रे येथील कार्टर रोडवर या सेलिब्रिटींनी निदर्शने केली. दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू, दिया मिर्झा, गोहर खान, अभिनेता राहुल बोस, अनुभव सिन्हा आदी यावेळी उपस्थित होते. त्यांच्यासोबत परिसरातील सर्वसामान्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here