नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, नंदुरबार हे तीन तालुके केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यात शहादा येथील विविध जातीचे वाण आजघडीला बाजारात चांगलेच नावारुपाला आले आहेत. आकाराने मोठी, लांब आणि चवीला गोड असणाऱ्या या केळीला भारतातील पंजाब, हरियाणा, दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्याचबरोबर आखाती देशात केळी निर्यात केली जाते. एका महिन्यात शहादा येथील व्यापाऱ्यांच्या मार्फत तब्बल १५ हजार टन केळी विदेशात पाठवली जाणार आहे. या पॅकिंग केलेल्या केळीला सध्या स्थानिक बाजार भावाहून अधिकचा भाव मिळाल्याचे व्यापारी अनिल पाटील यांनी सांगितले असून केळी उत्पादकांना चांगले दिवस आले आहेत.
शहाद्याचे शशिकांत पाटील हे एक केळी उत्पादन शेतकरी असून त्यांनी आपल्या मालकीच्या ७ एकर जमिनीपैकी निम्म्या जमिनीवर केळी लागवड केली आहे. केळीच्या एका झाडाला त्यांना ६० ते ८० रुपये खर्च आला असून आता त्यांना केळी निर्यातीतून ५०० रुपये अधिकचा दर मिळत असल्याने ते समाधान व्यक्त करत आहेत.
अशी होते निर्यात
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, नंदुरबार या तालुका परिसरातील गुणवत्तापूर्ण केळीची निवड केली जाते.सर्वप्रथम केळीच्या घडापासून फण्या वेगवेगळ्या करून त्याला बुरशीनाशक औषधाची फवारणी केली जाते. नंतर त्यांचे वजन करून विशिष्ट प्रकारच्या फोम मध्ये पॅक केले जाते. कॅरेटमध्ये त्याचे व्यवस्थित पॅकिंग करून कंटेनर वाहनाने मुंबईला पाठविण्यात येते. मुंबईत जेएनपीटीमध्ये प्रि-कुलिंग करून कोल्डस्टोअरेजच्या माध्यमातून जहाजाने ते दुबईला पाठविण्यात येतात. दुबईतून बाकी देशांना केळीची निर्यात होते.
विशेष म्हणजे केळीच्या निर्यातीसाठी केंद्र आणि राज्य शासनाची कुठलीही मदत अथवा मार्गदर्शन या शेतकऱ्यांना लाभलेले नाही. केवळ स्वतचा हिम्मतीवर आणि मेहनतीवर या शेतकऱ्यांनी खासगी कंपनीच्या मार्फत केळीची निर्यात सुरु ठेवली आहे.