पुणे : जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटाजवळ भीषण अपघात झाला आहे. नगर-कल्याण महामार्गावर हा अपघात झाला असून यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. इनोव्हा आणि पिकअप या गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास सदर अपघात घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, जुन्नर तालुक्यात रस्ते अपघाताची मालिका सुरूच आहे. मागच्या आठवड्यात आळेफाट्याजवळील अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज रात्री ९ वाजता माळशेज घाट परिसरात असणाऱ्या वाटखळ गावाजवळ पिकअप आणि इनोव्हा गाडीची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भयंकर होती की, इनोव्हा गाडीत असणाऱ्या सहापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात पिकअप चालक थोडक्यात बचावला आहे. वाहनांचा वेग इतका प्रचंड होता की इनोव्हाची एअर बॅग तुटून बाजूला पडल्याचीही माहिती आहे.

आकडा आणि काट्याचं बंटींनी नातं सांगितलं तर महाडिक म्हणतात, खोट दाखवा अन् दोन लाख बक्षीस मिळवा

इनोव्हा गाडीच्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने जुन्नर परिसरात एकच खळबळ उडाली असून बचावकार्यास सुरुवात करण्यात आली आहे. मृतांची नावे अद्याप समोर आली नसून इनोव्हा गाडी ही कल्याणकडून आळेफाट्याकडे चालली होती. तर पिकअप वाहन हे कल्याणच्या दिशेने चालले होते. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त वाहनांतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, नगर-कल्याण महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला असून अपघातांच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने वाहनचालकांकडून रस्ते नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here