चेतना अजमेरा यांची ७ मे २०१२ रोजी हत्या झाली होती. या हत्येमुळे मुंबई शहरात एकच खळबळ उडाली होती. चेतना या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जयंत अजमेरा यांच्या पत्नी होत्या. ७ मे २०१२ रोजी जयंत अजमेरा घरी आले तेव्हा त्यांना त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. या हत्याप्रकरणाचा तपास आणि सुनावणी सुरु असताना २०१५ साली जयंत अजमेरा यांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यापूर्वी जयंत अजमेरा यांनी न्यायालयात हत्येच्या दिवशीचा घटनाक्रम सांगितला होता. चेतना अजमेरा यांची हत्या झाली तेव्हा त्यांच्या दोन्ही मुली सुट्टीसाठी लंडनला गेल्या होत्या. ७ मे २०१२ रोजी मी आणि माझी पत्नी सकाळी ७.३० वाजता उठलो आणि नेहमीप्रमाणे योगा केला. त्यानंतर माझी पत्नी भाजीपाला आणण्यासाठी बाजारात गेली. दुपारी साडेबाराच्या सुमारास ती परत आली. यानंतर मी वडाळा येथील कन्स्ट्रक्शन साईट पाहण्यासाठी घरातून निघालो. मी घरातून निघत असताना आमच्या खिडकीजवळ दोन कामगार काहीतरी काम करत असताना मला दिसले होते, असे जयंत अजमेरा यांनी न्यायालयात सांगितले होते.
त्यादिवशी जयंत अजमेरा रात्री ८ वाजता काम संपवून घरी आले. त्यांनी घराची बेल वाजवली तेव्हा चेतना अजमेरा यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे जयंत अजमेरा दरवाजा उघडून आतमध्ये गेले. तेव्हा जयंत अजमेरा यांना त्यांनी पत्नी चेतना या सोफ्याच्या बाजूला जमिनीवर पडलेल्या दिसल्या. त्या रक्ताच्या थारोळ्यात होत्या. चेतना यांचा गळा धारदार शस्त्राने चिरण्यात आला होता आणि त्यांच्या डोक्यावरही जखम दिसत होती. जयंत अजमेरा यांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, चेतना यांच्या मृतदेहाशेजारी त्यांच्या किचनमधील एक सुरी पडली होती. यानंतर जयंत अजमेरा यांनी बिल्डिंगच्या सेक्रेटरीला फोन करून सर्व कळवले. सेक्रेटरीने पोलिसांना पाचारण केले, त्यानंतर चेतना अजमेरा यांना रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी चेतना अजमेरा यांना मृत घोषित केले.
माझं वडिलांकडून लैंगिक शोषण, महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा धक्कादायक गौप्यस्फोट
घरातील हिऱ्याचे दागिने गायब
जयंत अजमेरा यांनी पोलीस आणि न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, पत्नीची हत्या झाल्याचे लक्षात येताच घर तपासले तेव्हा त्यांच्या घरातील दागिने गायब झाले होते. यामध्ये कानातले दागिने, घड्याळ आणि हिऱ्याने मढवलेल्या बांगड्यांचा समावेश होता. ९ मे २०१२ रोजी जयंत अजमेरा पोलीस ठाण्यात गेले होते. तेव्हा पोलिसांनी सांगितले की, चेतना अजमेरा यांची हत्या तुमच्या घरात पूर्वी काम करत असलेल्या अशोक पुरोहित आणि हेमंत मणेरिया या दोन स्वयंपाकींनी केली आहे. हत्येच्या तीन महिन्यांपूर्वीच अजमेरा यांनी अशोक पुरोहित याला कामावरुन काढून टाकले होते. अशोक पुरोहित कामावर नीट येत नसल्याने चेतना अजमेरा यांनी एक-दोनदा सुनावले होते, असे जयंत अजमेरा यांनी न्यायालयासमोर सांगितले होते.
चेतना अजमेरा यांच्या हत्येनंतर १० महिन्यांनी मुंबई पोलिसांनी अशोक पुरोहितला राजस्थानमधून अटक केली होती. तर महेंद्र सिंग राठोड, शामलाल सोनी आणि हेमंत मनेरिया यांना राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश आदी राज्ये पालथी घालून पोलिसांनी शोधून काढले होते.