पुणे: दोन दिवसांपूर्वीच करोनामुक्त झालेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील -निलंगेकर यांचं आज पहाटे पुण्यात किडनी विकारानं निधन झालं. ते ९१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर त्यांचे नातू होत. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. शिवाजीराव निलंगेकर यांना करोनाची लागण झाली होती. वयाच्या ९१व्या वर्षीही त्यांनी करोनावर मात केली होती. दोन दिवसांपूर्वीच त्यांचा करोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना नॉन कोविड वॉर्डमध्ये हलवण्यात आलं होतं. रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू असतानाच आज पहाटे प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांनी अंतिम श्वास घेतला. पहाटे २ वाजून १५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. किडनी विकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. त्यांचे पार्थिव आज सकाळी पुण्याहून निलंग्याकडे नेण्यात येणार आहे. त्यानंतर निलंग्यात त्यांची अंत्ययात्रा निघेल आणि दुपारी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

१४ तारखेला शिवाजीरावांना ताप आणि सर्दीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर निलंग्यातील डॉक्टरांशी चर्चा करून त्यांना लातूरला हलवण्यात आलं. तिथं त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र, तिथं त्यांची करोना चाचणी करून घेण्यात आली होती. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, त्यांनी उपचारांना प्रतिसाद देऊन या संकटावर मात केली होती.

शिवाजीराव निलेंगेकर- पाटील हे अतिशय शिस्तप्रिय राजकारणी म्हणून ओळखले जात होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी भाग घेतला होता. स्वातंत्र्यसेनानी म्हणून त्यांचा सरकारने गौरव केला होता. निलेंगकर-पाटील यांनी राज्याचे दहावे मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळली होती. १९८५-८६मध्ये ते मुख्यमंत्री होते. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळातही ते होते. तसेच १९९०-९१मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्यांच्या जाण्याने प्रशासनावर हुकूमत असलेला, ग्रामीण महाराष्ट्राची जाण असलेला आणि शिस्तप्रिय राजकारणी हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

निलंगेकर यांच्या निधनाने स्वातंत्र्यलढ्यात, महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणारे नेतृत्व गमावले: अजित पवार

राज्याचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते साहेबांच्या निधनाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणार महत्त्वाचं नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नेतृत्व हे संघर्षातून निर्माण झालं होतं. जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी संघर्ष केला. सामाजिक, वैचारिक बांधिलकी जपणारे निष्ठावान नेतृत्व म्हणून ते सदैव स्मरणात राहतील. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here