कोलकाता: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जाधवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. आंदोलनावेळी आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाली. त्यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संकुलात काल, संध्याकाळी चेहरे झाकलेल्या व्यक्तींनी विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला. जेएनयूएसयूची अध्यक्षा आयशी घोष आणि अन्य विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या विद्यार्थ्यांना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावा जेएनयूएसयूने केला होता. जेएनयू टीचर्स असोसिएशनने वाढलेल्या शुल्कवाढीसंदर्भात एक बैठक बोलावली होती, त्यावेळी चेहरे झाकलेल्या काही व्यक्तींनी विद्यार्थी आणि शिक्षकांना मारहाण केली.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटले. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला, तर पुण्यातही एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला. बॉलिवूडमधील कलाकारांनीही या हल्ल्याच्या घटनेचा निषेध केला. सर्व स्तरांतून या हल्ल्याचा निषेध व्यक्त होत असतानाच, जाधवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आज, आंदोलन करत निषेध व्यक्त केला. त्यावेळी कोलकाताच्या सुलेखा मोडजवळ पोलीस आणि आंदोलक विद्यार्थी आपापसांत भिडले. त्यावेळी पोलिसांना विद्यार्थ्यांवर लाठीमार करावा लागला.

दरम्यान, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री उफाळलेल्या हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज, सोमवारी पत्रकार परिषद घेतली. या घटनेचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे असून, सर्व सीसीटीव्ही चित्रण तपासण्याचे काम सुरू आहे. काही महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. त्यांची चौकशी होत आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here