२०२० च्या भीषण निसर्ग वादळानंतर झालेल्या नुकसानानंतर बागेत काहीतरी नवीन करायचं विनय जोशींनी ठरवलं होतं.आसामचा चहा डोळ्यासमोर आला. आसाममधील पीकपाणी, झाडं, फळं आणि लहान सहान तण सुद्धा कोकणात उगवतं. मग जोशी यांनी गेल्या वर्षी पासून “मुर्डी चहा लागवड प्रकल्प” सुरु केला आणि आता लागवड संपली आहे. वर्षभरातल्या रोपांच्या कामगिरीवरून चहा इथे चांगला तग धरुन एक पीक म्हणून पुढे येईल अशी खात्री जोशी यांना वाटत आहे.
सलग काही वर्ष नियमितपणे वर्षभर पडणारा पाऊस आणि त्यामुळे कोकणच्या हापूस आंब्याचं नुकसान दरवर्षी होत असतं. त्याला पर्याय म्हणून जोशी यांनी चहाचा पर्याय निवडला.
आसाम मेघालय परिसरात चहाच्या मळ्यांना ‘चाय बागान’ म्हणण्याची पद्धत आहे. यानिमित्ताने आता इथेच चाय बागान उभी राहत आहे, असं विनय जोशी म्हणाले. आसाम परिसरातील अनेक वनस्पती कोकणात उगवतात त्यामुळे चहा लागवडीचा हा प्रयोग कोकणातही यशस्वी होईल असा विश्वास विनय जोशी यांनी व्यक्त केला.
विनय जोशी हे आपल्या अन्य सामाजिक कामाच्या माध्यमातून देशातील अनेक भाग ते फिरले आहेत त्यामुळे आसाम व कोकण येथील अनेक गोष्टीत साधर्म्य असल्याचं ते सांगतात. विनय जोशी यांचे वडील विनाभाऊ जोशी यांना आसाममधील चहाचे मळे पाहण्याची इच्छा होती. त्याची आठवण म्हणून त्यांनी कोकणात लागवड केली आहे. गेल्या वर्षभरातील रोपांची लागवड व रोपांची उत्तम असलेली सद्यस्थिती यावरून या आपल्या अनोख्या नव्या प्रयोगाला नक्कीच यश येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, विनय जोशी यांचा चहाच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्यास कोकणातील शेतकऱ्यांना नवा पर्याय मिळण्याची शक्यता आहे.