नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे एका तरुणाने आंघोळ करत असलेल्या महिलेचा बाथरूमच्या खिडकीतून मोबाईल फोनद्वारे व्हिडिओ बनवला. दरम्यान, हा तरुण व्हिडिओ करत असतानाच महिलेचा पती घरी आला आणि त्याने सदर विकृत तरुणाला चांगलाच चोप दिला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून गोलू उर्फ कमलेश हजारे (वय २३, मौदा) असं आरोपी तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात कमलेश हजारे याची एका २३ वर्षीय विवाहित महिलेशी ओळख होती. शेजारी राहत असल्याने तो घरी येत होता. मात्र कमलेशचे त्या महिलेवर एकतर्फी प्रेम होते. शेजारी असल्याने सदर महिला कमलेशकडे दुर्लक्ष करायची. मात्र १ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता महिला आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली होती. ती अंघोळ करत असताना कमलेश गुपचूप बाथरूमजवळ आला. त्याने बाथरूमच्या खिडकीतून मोबाईलने फोटो आणि व्हिडिओ काढले. मात्र या प्रकाराची महिलेला कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी ती अंघोळ करत असताना कमलेश हा पुन्हा सदर महिलेचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढत होता.
दरम्यान, महिलेचा पती घरी आला. त्याला बाथरूमच्या मागे कमलेश मोबाईलद्वारे व्हिडिओ बनवत असल्याचे दिसले. त्याने धावत जात कमलेशला पकडले आणि त्याचा मोबाईल तपासला. यावेळी महिलेच्या पतीला कमलेशच्या मोबाईलमध्ये आपल्या पत्नीचे नग्न फोटो आणि दोन व्हिडिओ आढळून आले. हे पाहून नवऱ्याचा राग अनावर झाला आणि त्याने कमलेशची चांगलीच धुलाई केली.
दरम्यान, या संतापजनक घटनेनंतर पीडितेच्या पतीने पत्नीसह मौदा पोलीस ठाणे गाठले. या दोघांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी कमलेश हजारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.