ट्रम्प येण्यापूर्वी कोर्ट परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ट्रम्प आपल्या आठ कारच्या ताफ्यासह कोर्टात पोहोचले. आपला सतत छळ होत असल्याचे ट्रम्प यांनी सोमवारी फ्लोरिडा सोडण्यापूर्वी ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे. ट्रम्प यांनी स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देण्याच्या संदर्भात आपण कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचे म्हटले आहे . ट्रम्प अध्यक्ष असताना मॅनहॅटन जिल्हा वकील कार्यालयाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती.
ट्रम्प यांच्या अटकेवर व्हाईट हाऊसने बाळगले मौन
व्हाईट हाऊसने ट्रम्प यांच्यावर न्यूयॉर्कमधील आरोप आणि अटक यावर भाष्य करण्यास नकार दिला. दैनंदिन ब्रीफिंगमध्ये, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन-पियरे म्हणाल्या की ही एक न्यायप्रविष्ट बाब आहे आणि म्हणून आपण त्यावर टिप्पणी करणार नाही. राष्ट्रपती नेहमीप्रमाणे अमेरिकन लोकांवर लक्ष केंद्रित करणार आहेत. यानंतर पियरे यांनी फिनलंड नाटोमध्ये सामील झाल्याची माहिती देण्यास सुरुवात केली. रशियातील वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टरच्या अटकेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत
हा खटला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या काही दिवस आधी ऑक्टोबर २०१६ च्या अखेरीस डॅनियल्सला त्याच्या तत्कालीन वैयक्तिक वकील मायकेल कोहेनच्या वतीने US$१३०,००० इतक्या पेमेंटशी संबंधित आहे. एका दशकापूर्वी ट्रम्प यांच्याशी असलेल्या कथित संबंधांबद्दल त्यांनी कोणताही खुलासा करू नये म्हणून डॅनियल्स यांना ही रक्कम कथितरित्या देण्यात आली होती. ट्रम्प यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, ट्रम्प यांना या प्रकरणी जामीन मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.