>> डॉ. किरण गोडसे, त्वचाविकारतज्ज्ञ

‘मुरुमं..’ हा शब्द ऐकल्यावर अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात. इंटरनेटवर ‘अॅक्ने’ अर्थात , तारुण्यपिटिकांच्या समस्येबद्दलची खरीखोटी माहिती दिलेली असते. जुन्याजाणत्यांच्या अनुभवांपासून ते मैत्रीपूर्ण सल्ल्यांपर्यंत, केमिस्टकडे मिळणाऱ्या औषधांपेक्षा परिणामकारक असल्याचा दावा करणाऱ्या घरगुती उपचारांपासून ते नैसर्गिक उपचारांपर्यंत साऱ्यांचा भडिमार होताना दिसतो. त्यामुळे आपल्या ‘मुरुमां’वरील उपचारांना सुरुवात करण्यापूर्वी या समस्येशी जोडलेल्या गैरसमजांपासून स्वत:ला दूर नेणे आवश्यक आहे.

‘मुरुमां’शी संबंधित काही सर्वसाधारण मिथके आणि या गोष्टी कपोलकल्पित का आहेत, यामागची कारणे पुढीलप्रमाणे –

मिथक : चेहरा जास्त वेळा धुतल्याने ‘मुरुमां’चे शुद्धीकरण होते
वास्तव: मुरुमं ही धुळीमुळे उद्भवत नाहीत. त्वचेवरील छिद्रे धूळ बसल्याने बाहेरून बंद होतात, त्यामुळे मुरुमे उद्भवतात. पण वास्तवात ही छिद्रे आतल्या बाजूने बंद झालेली असतात. अॅक्नेला झाकण्याऐवजी सतत चेहरा धूत राहिल्याने ही छिद्रे अधिकच छेडली जातात आणि अधिक भरतात. यामुळे त्वचा प्रचंड कोरडी बनू शकते. दिवसांतून केवळ दोन वेळा चेहरा धुणे योग्य.

मिथक: उन्हामुळे ‘मुरुमं’ स्वच्छ होतात
वास्तव : दिवसातून १०-२० मिनिटे सूर्यप्रकाशात राहिल्याने मुरुमांचा त्रास असलेल्या मंडळींना काही मदत होऊ शकते, हे खरे आहे. विशेषत: अशी मुरमं पाठीवर किंवा शरीराच्या इतर भागांवर असतील तर. पण खूपवेळ उन्हात राहिल्याने त्वचेची हानीच होते. उन्हात राहिल्यानंतर येत्या आठवड्यांमध्ये मुरुमांची संख्या वाढलेलीच दिसेल.

मिथक : मेकअप हे अॅक्ने होण्याचे एक कारण आहे.
वास्तव : मुरुमं होण्यासाठी बरेचदा मेकअपला विनाकारण दोषी ठरवले जाते; पण खरे सांगायचे तर केवळ मेकअपमुळे मुरुमं होत नाहीत. या समस्येचे मूळ दडले आहे मेकअप काळजीपूर्वक उतरवण्यात होणारी दिरंगाई. तुम्ही दिवसभर मेकअप वापरत असाल तर रात्री त्वचेला श्वास घेण्यासाठी काही काळ देणे आवश्यक आहे. तेव्हा झोपी जाण्यापूर्वी चेहऱ्यावरचा मेकअपचा संपूर्णतः धुवून टाकण्याची काळजी घ्या.

मिथक: तेलकट पदार्थ खाल्ल्याने मुरुमं होतात.
वास्तव : हे मात्र खरे आहे. पण ज्यांची त्वचा मुरुमं होण्याच्या बाबतीत अधिक संवेदनशील आहे, त्यांच्या बाबतीत खाद्यपदार्थांमुळे ती उद्भवण्याची शक्यता जास्त असते. त्या पदार्थाचा तेलकटपणा नव्हे; तर त्यातील जळजळ वाढवणारे घटक हे मुरुमे वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. ग्लायसेमिक इंडेक्स किंवा स्निग्धांश अधिक असलेल्या खाद्यपदार्थांमुळेही अॅक्ने होण्यास होतात.

मिथक: ताणतणावामुळे अॅक्ने होतात.
वास्तव: ताणतणावामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्सचे म्हणजे संप्रेरक ग्रंथींच्या कार्याचे संतुलन ढळते आणि त्यामुळे मुरुमं होतात हे खरे आहे. पण मुरुमांवरील कोणत्याही चांगल्या उपचारांमध्ये ताणतणावामुळे तुमच्या मुरुमांवर होणाऱ्या कोणत्याही परिणामांवर मात करण्याची क्षमता नक्कीच असते.

मुरुमे टाळण्यासाठी हे करा…

– दिवसातून दोनदा चेहरा धुवा
– आठवड्यातून दोनदा अॅण्टी डॅण्ड्रफ शाम्पू वापरा.
– भरपूर पाणी प्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here