कोल्हापूर/ वाडी रत्नागिरी: दख्खनचा राजा जोतिबा देवाची आज बुधवारी चैत्र पौर्णिमा यात्रा होत आहे. यासाठी जोतिबा डोंगरावर काल पासूनच तब्बल तीन लाख भाविक दाखल झाले आणखी भक्त येत आहेत. चांगभलंच्या गजरात आणि गुलालाची मुक्त उधळण करत मानाच्या सासनकाठ्या दाखल होत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस असून ज्योतिबा मंदिरात पहाटे तीनपासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ झाला. पाच वाजता महाभिषेक महापूजा संपन्न झाली, त्यानंतर आता १० वाजता धुपारती सोहळा होईल. हस्तनक्षत्रावर सांय ५.३० वाजता श्री. जोतिबाचा पालखी सोहळा निघेल. यात्रेत गुलाल-खोबरे, बंदी नाणी यांची पालखीवर होणारी उधळण अनोखी असते.

तीन दिवसांच्या यात्रेतील मुख्य दिवस बुधवारी आहे. पहाटे ३ वाजता घंटानाद, काकड आरती, पाद्यपूजा, मुखमार्जन हे विधी होतील.पहाटे ५ वाजता पन्हाळा प्रांत अमित माळी यांच्यासह देवस्थान समितीच्याक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महाअभिषेक होईल. त्यानंतर देवाची राजदरबारी बैठी अलंकार महापूजा होईल. दुपारी १ वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठीचे पूजन होईल. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांच्यासह मानकरी उपस्थित असतील. यानंतर सासनकाठीच्या मिरवणुकीस देवस्थान कमिटीचे म्हालदार, चोपदार तोफेच्या सलामीने मिरवणुकीस प्रारंभ होईल. यासाठी मानाच्या सासनकाठ्या जोतिबावर दाखल झाल्या असून चांगभलंच्या गजराने अवघा डोंगर दुमदुमून गेला आहे. पहिला मान निनाम पाडळी (जि.सातारा) या सासनकाठीचा असतो. मानाच्या १८ सासनकाठ्या सहभागी होतील. एकूण ९६ सासनकाठ्या सहभागी असतात. या मिरवणुकीमध्ये २० ते ८० फुटांच्या उंच सासनकाठ्या सहभागी असतात.

VIDEO : धो-धो पावसाने दख्खनचा राजा ज्योतिबा डोंगरावरील गुलाल गेला वाहून

आज ज्योतिबाच्या नावानं चांगभलं जा गजरात ज्योतिबाची यात्रा पार पडत आहे. यासाठी तब्बल आठ लाख भाविक ज्योतिबा डोंगरावर उपस्थित राहणार असल्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जय्यत तयारी केली आहे. ठिकठिकाणी पोलीस तसेच सीसीटीव्ही कॅमेरा आणि ड्रोन द्वारे गर्दीवर नजर ठेवण्यात येत असून डोंगरावर ये जा करण्यासाठी अनेक वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहे. तर यात्रा काळात येणाऱ्या भाविकांसाठी सामाजिक सेवा आणि संस्थांच्यावतीने ठिकठिकाणी मोफत अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले असून एसटी महामंडळाच्यावतीने २४ तास बससेवा सुरू ठेवण्यात आली आहे.

ज्योतिबाचा घोडा पांढऱ्या रंगाचा का? कुणी भेट दिला? उलगडणार कथा

वादळी वाऱ्याचा कहर; गुलालाने माखलेला ज्योतिबाचा डोंगर धुवून गेला

करोनाच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षे भाविकांची गर्दी कमी होती. यंदा मात्र पंधरा लाखावर भाविक उद्या डोंगरावर येण्याची अपेक्षा आहे. ही गर्दी अपेक्षित धरून प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी पंचगंगा नदी घाट, गाय मुख आणि मंदिर परिसरात अन्नछत्राची सोय केली आहे. यासाठी शिवाजी चौक तरूण मंडळ, सहजसेवा ट्रस्ट, महालक्ष्मी भक्त मंडळ, आर.के. मेहता ट्रस्ट सक्रीय आहे. आजपासूनच हे अन्नछत्र सुरू झाले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. १४५ सीसीटीव्ही च्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन, व्हाईट आर्मी, ग्रामपंचायत, देवस्थान समितीच्या वतीने अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांच्या सोयीसाठी कोल्हापूर ते ज्योतिबा अशी २४ तास एसटीची सुविधा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here