केईएम रुग्णालयाच्या या पोस्टमार्टेम अहवालानुसार, वीणा जैन यांचा मृत्यू गळा दाबण्यात आल्यामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. केईएम रुग्णालयातील पाच फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने वीणा जैन यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले होते. त्यांनी मंगळवारी त्याचा अहवाल मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केला. हा अहवाल अंतिम नसला तरी त्यामध्ये समोर आलेल्या गोष्टींमुळे लालबाग हत्याकांडाच्या तपासाची दिशा पूर्णपणे बदलू शकते. अहवालात म्हटल्याप्रमाणे, वीणा जैन यांच्या शरीराच्या काही भागामध्ये इजा झाल्याचे दिसत आहे. हा प्रकार काहीसा आश्चर्यकारक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रिंपलने तिची आई पहिल्या मजल्यावरील सार्वजनिक शौचालयात जात असताना खाली पडल्याचे म्हटले होते. यामध्ये तिचा मृत्यू झाल्यानंतर मी घाबरून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचे रिंपलने म्हटले होते. परंतु, शवविच्छेदन अहवालानुसार, वीणा जैन यांच्या शरीरावर अनेक भागांना इजा झाल्याचे दिसत आहे. यावरुन वीणा जैन यांचा गळा जोराने दाबल्याचा आणि त्यांना मृत्यूपूर्वी बेदम मारहाण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
वीणा जैन यांच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
काळाचौकी पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने प्रश्नांची एक यादी फॉरेन्सिक तज्ज्ञांकडे पाठवली होती. केईएम रुग्णालयातील तज्ज्ञांच्या अहवालानुसार, वीणा जैन यांच्या मानेचे यू आकारातील हाड (Hyoid Bone) पूर्णपणे तुटून शरीरापासून वेगळे झाले होते. हे हाड तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचेही निदर्शनास आले. तसेच वीणा जैन यांच्या बरगड्यांनाही जबर मार बसून त्या फ्रॅक्चर झाल्याचे निदर्शनास आले आहे. या सगळ्या गोष्टी पाहता फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून काही अंदाज वर्तविण्यात आले आहेत. रिंपलने वीणा जैन यांचा गळा जोराने दाबल्यामुळे त्यांच्या मानेचे हाड तुटले असावे. तसेच रिंपलने वीणा जैन यांच्या मृत्यूपूर्वी त्यांना बेदम मारले असावे, असाही संशय आहे. त्यामुळेच वीणा जैन यांच्या बरगड्या तुटल्या असण्याची शक्यता आहे. अन्यथा रिंपल म्हणते त्याप्रमाणे पहिल्या मजल्यावरुन पडल्यामुळे वीणा जैन यांच्या बरगड्यांना मार बसला असू शकतो.
मात्र, या सगळ्यावरुन कोणताही ठोस निष्कर्ष काढता येणे शक्य नाही. त्यामुळे आता वीणा जैन यांचा मृतदेह हिस्टोपॅथोलॉजिकल चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यावरुन वीणा जैन यांच्या मानेचा भाग आणि बरगड्या मुत्यूपूर्वी फ्रॅक्चर झाल्या होत्या की मृत्यू झाल्यानंतर शरीराचे तुकडे करताना फ्रॅक्चर झाले, हे स्पष्ट होऊ शकेल. वीणा जैन यांच्या शरीरातील मुख्य हाडे फ्रॅक्चर झाली आहे. त्यामुळे त्यांच्या हत्येमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असू शकतो. त्यांच्या मानेचे हाड ज्याप्रकारे तुटले आहे, त्यावरुन त्यांचा गळा दाबण्यात आल्याची दाट शक्यता आहे. या सगळ्याचा अंतिम अहवाल आल्यानंतरच आम्ही रिंपल जैनविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र सादर करु, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
माझं वडिलांकडून लैंगिक शोषण, महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा धक्कादायक गौप्यस्फोट