रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ३ वर हा प्रकार सोमवारी संध्याकाळी घडला. सीएसएमटीवरुन कर्जतला जाणारी लोकल ट्रेन साधारण ७.१०च्या सुमारास दिवा स्थानकात दाखल झाली. कर्जत लोकल असल्याने या गाडीत नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती. या गाडीतील काही प्रवाशांना दिवा स्थानकात उतरायचे होते. मात्र, एका प्रवाशाने दरवाजा अडवून ठेवला होता. खरंतर या प्रवाशाला पुढे उतरायचे होते. दिवा स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांनी त्याला पाठीमागे जाण्यास सांगितले. मात्र, संबंधित प्रवाशाने दरवाजातून हटण्यास नकार देत वाद घालायला सुरुवात केली. त्यामुळे दिव्यातील प्रवाशी प्रचंड संतापले.
हा वाद इतका विकोपाला गेला की, लोकल ट्रेन थांबताच प्रवाशांनी दरवाजातील व्यक्तीला अक्षरश: खेचून बाहेर काढले. संतापलेले प्रवाशी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी दरवाजा अडवून ठेवणाऱ्या व्यक्तीला प्लॅटफॉर्मवर आडवं करून लाथाबुक्क्यांनी अक्षरश: तुडवले. हे सर्व संतापलेले प्रवासी बेभान होऊन खाली आडव्या पडलेल्या व्यक्तीवर लाथांचा वर्षाव करत होते. मारहाण करणारे बरेच जण असल्याने संबंधित व्यक्तीला थोडाही प्रतिकार करता आला नाही. बचावासाठी दोन्ही हात डोक्याभोवती दुमडून हा व्यक्ती मार सहन करत राहिला. यादरम्यान संतापलेल्या प्रवाशांनी या व्यक्तीच्या छाती, पोट, पाठ अशा सर्वांगावर जागा मिळेल तिथे लाथांचा वर्षाव केला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
हा सगळा प्रसंग घडल्यानंतर दिवा स्थानकातील रेल्वे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, तोपर्यंत मार खाणारी व्यक्ती आणि चोप देणारा प्रवाशांचा जमाव सगळे पांगले होते. या सगळ्या प्रकारानंतर रेल्वे प्रवाशांच्या संघटनेने कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांकडून सध्या मारहाण झालेल्या प्रवाशाचा शोध घेतला जात आहे. त्यानंतर याप्रकरणात गुन्हा दाखल केला जाईल.
ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकरण, ठाकरे कुटुंब हॉस्पिटल बाहेर पोहोचताच शिवसैनिकांची गर्दी!