म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागांच्या सचिवांना फाइलवर शेरा लिहिताना तो मराठीत लिहिण्याची सक्ती केली आहे. शेरा मराठीत लिहिला नसेल तर फाइल परत पाठवली जाणार आहे,’ अशी माहिती भाषामंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

पत्रकार दिनानिमित्त देसाई यांनी सोमवारी मंत्रालयात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी सरकारची राजभाषेविषयीची भूमिका मांडली. सरकारी व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढावा, असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रशासनातील अधिकारी तसेच विभागाच्या सचिवांना फाइलवर शेरा लिहिताना तो मराठीतच लिहावा, असे सांगण्यात आले आहे. इंग्रजीत शेरा लिहिला असेल तर फाइल परत पाठविण्याची सूचना ठाकरे यांनी दिल्या असल्याचे देसाई यांनी सांगितले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून सरकारने केंद्राला पत्र लिहिले आहे. तसेच रंगभवन येथे मराठी भाषाभवन उभारण्याच्या आधीच्या सरकारच्या निर्णयाची माहिती घेऊन योग्य कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

रोजगार निर्मितीला प्राधान्य

राज्यात रोजगार निर्मितीला सरकारने प्रधान्य दिले आहे. त्यानुसार किती गुंतवणूक केली यापेक्षा जे उद्योग जास्तीत जास्त रोजगार निर्माण करतील त्यांना सरकारकडून सवलती आणि आवश्यक त्या परवानग्या दिल्या जातील, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here