ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या ठाण्यातील महिला कार्यकर्त्या रोशणी शिंदे यांना झालेल्या मारहाणीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केल्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात मोर्चा काढत सरकारवर हल्ला चढवला. तसंच सत्तेत येताच पक्षाच्या लोकांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब चुकता करणार असल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांना आव्हानही दिलं आहे.’जणू काही मोगलाई आपल्या राज्यात आली आहे, असा सध्याच्या सरकारचा कारभार सुरू आहे. कारण सगळी आक्रमणं बाहेरून होत आहेत. मुख्यमंत्री जे बसले आहेत तेही महाराष्ट्राचे नाहीत, ते तर गुजरातचे आणि गुवाहाटीचे आहेत. तुम्हाला आज सांगतो, हे सरकार काही महिन्यांचं नाही, काही दिवसांचं नाही, तर काही तासांचं आहे. हे सरकार पडल्यानंतर सगळ्यांची मोजमापं करणार. आम्ही कधी बदल्याच्या भूमिकेने काम करत नाही. मात्र जे लोकांच्या भल्याचं आहे, ते केल्याशिवाय राहणार नाही, हे आज तुम्हाला सांगायला मी आलो आहे. जे कोणी अधिकारी असतील किंवा गद्दार गँगमधील चिलटं असतील त्यांना सांगतोय, सरकार आल्यानंतर चौकशी करणार म्हणजे करणार आणि जेलभरो आंदोलन करणार. आज जे आंदोलन करतायत त्यांना नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकणार. हीच शपथ घ्यायला आज दिघे साहेबांच्या शक्तिस्थळावर आलो आहे,’ अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

पाण्यावर तरंगणाऱ्या बाबांचा नेमका चमत्कार काय? पुण्यातल्या शिक्षकाने सांगितलं खरं ‘रॉकेट सायन्स’

‘मी गद्दार गँगचं कौतुक करायला आलो आहे’

‘मी आज गद्दार गँगच्या नेत्याचं कौतुक करायला आलो आहे की तुमच्यावर नेमके कसले संस्कार झाले आहेत? तुमच्या-माझ्या ठाण्याला त्यांनी काल एका दिवसात भयानक पद्धतीने बदनाम केलं आहे. एका बाईला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली जाते. तिच्या पोटामध्ये लाथा मारल्या जातात. तिला हाताला धरून खेचलं जातं आणि माफी मागायला लावली जाते. खरंतर तुम्ही माफी मागण्याच्या लायकीचे नाहीत आणि माफ करण्याच्याही लायकीचे नाहीत. आम्ही तुम्हाला माफही करणार नाही आहोत. या महिलेचा गुन्हा काय होता तर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. एकीकडे दोन रुपयांसाठी अनेक ट्रोल्स आमच्यावर घाणेरडी टीका करत आहेत. हे सगळं होत असताना मुख्यमंत्र्यांकडून एक शब्दही नाही. पुढे जाऊन त्याच महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सगळं तुम्हाला चालणार आहे का?’ असा सवाल उपस्थितांना विचारत आदित्य ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला.

दरम्यान, ‘जो माणूस या ठाण्याला स्वत:चा बालेकिल्ला समजत होता, आता नाही समजत ते ठाण्याला बालेकिल्ला. कारण मी त्यांना आव्हान दिलं आहे की या ठाण्यातून मी लढून आणि जिंकून दाखवतो. ठाणेकर मला स्वीकारायला तयार आहेत का?’ असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here