म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

क्षयरोगावर नियंत्रण आणण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करत असल्याचा दावा प्रशासन करत असले तरीही अद्याप वाढत्या लोकसंख्येमध्ये क्षयरुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी यंत्रणेला यश मिळालेले नाही. उपलब्ध आकडेवारीनुसार २०१८मध्ये राज्यात क्षयरोगामुळे ६४७६ जणांचा मृत्यू झाला आहे. रोज सुमारे १७ जणांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असल्याचे दिसून येते. योग्यवेळी वैद्यकीय उपचार न मिळणे, औषधांची उपलब्धता नसणे तसेच वैद्यकीय उपचार अर्धवट सोडल्यामुळे हे प्रमाण वाढीस लागले आहे. क्षयरोगासंदर्भात सर्वसामान्यांमध्ये आजही जाणीवजागृती नाही; तसेच आजारासंदर्भात असणारी भीतीही वैद्यकीय उपचारप्रक्रियेमध्ये आड येत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात दिलेल्या माहितीमध्ये २०१८मध्ये देशात एकूण ६९ हजार ३७५ जणांचा मृत्यू क्षयरोगामुळे झाला आहे. तर त्यातील सहा हजार ४७६ मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. २०१८मध्ये देशात क्षयरुग्णांमुळे झालेले मृत्यू आणि रुग्णसंख्या यामध्ये उत्तर प्रदेशचा पहिला तर महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा होता.

२०१७मध्ये राज्यात टीबीमुळे ५०६६ जणांचा मृत्यू झाला होता तर २०१८मध्ये हे प्रमाण २८ टक्क्यांनी वाढले आहे. मागील काही वर्षांमध्ये क्षयरोगाला निर्माण झालेला औषधांचा प्रतिरोध हेदेखील महत्त्वाचे कारण असल्याचे दिसून येते. अनेक औषधांचा त्रास रुग्णांना होतो, त्यामुळे औषधोपचार अर्धवट सोडून देण्याचा प्रकार घडतो. फुफ्फुसरोगतज्ज्ञ डॉ. व्ही. एस. कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधांसोबत भरपेट सकस आहारही घ्यायला हवा. अनेकदा हा आहार घेण्याची इच्छा व आर्थिक स्थितीही रुग्णांमध्ये नसते. त्यामुळेही औषधांची मात्रा चालत नाही. अनेक औषधांचा प्रतिरोध वाढता आहे. त्यामुळे क्षयरुग्णांवर वैद्यकीय उपचार करताना येणाऱ्या अडचणी वाढल्या असल्याचे दिसून येते.

२८ टक्क्यांची वाढ

वर्ष – मृत्यूंची संख्या

२०१६ – ६१२१

२०१७ – ५०६६

२०१८-६४७६

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here